बेकायदेशीर ड्रोनविरोधात शोध मोहीम सुरूच;संख्या रोडावली
राहुरी |
राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद बेकायदेशीर ड्रोनच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासनाची मोहीम सुरूच असून ड्रोन संख्या मात्र रोडावली आहे नागरिकांच्या दृष्टीस पडणाऱ्या या ड्रोनमुळे परिसरात निर्माण झालेले भीती आणि संभ्रमाचे वातावरण आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी या ड्रोनचा उगम, मालक आणि उद्देश अद्यापही स्पष्ट झालेला नाही.
सोमवारी रात्री राहुरी पोलिसांनी पुन्हा एकदा ‘मिशन अँटी ड्रोन’ अंतर्गत विशेष तपास मोहीम राबविली. या मोहिमेत अत्याधुनिक अँटी-ड्रोन गन तसेच लेझर गनच्या सहाय्याने आकाशातील संशयास्पद हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ड्रोनची उंची, दिशा आणि हालचाली यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर करण्यात आला.
या मोहिमेत राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस कर्मचारी सूरज गायकवाड, पुणे येथील अँटी-ड्रोन पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप जगताप, जालिंदर साखरे, प्रमोद ढाकणे, सोहेल सय्यद, रियाज शेख यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, पत्रकार शिवाजी घाडगे, चंद्रकांत कराळे आणि संतोष खाडे यांनी सहभाग घेतला.
पुणे येथील विशेष पथकाने सोमया फार्म परिसरात ड्रोन शोधमोहीम राबविली. यावेळी लेझर गन आणि अँटी-ड्रोन गनच्या सहाय्याने संशयास्पद उड्डाणांवर लक्ष ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी आकाशात दिसणाऱ्या ड्रोनची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण काही प्रमाणात कमी करण्यात यश आले असले, तरी या ड्रोनमागील नेमका सूत्रधार कोण, त्यांचा उद्देश काय आणि ते कोणत्या कारणासाठी रात्रीच्या वेळी उड्डाण करत आहेत, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, संबंधित ड्रोन ताब्यात घेणे किंवा निष्क्रिय करणे शक्य झाल्यासच त्यांच्या मालकांची आणि उद्देशाची स्पष्ट माहिती समोर येऊ शकते.
दरम्यान, स्थानिक पोलिस प्रशासनाकडून तपास आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून आवश्यकतेनुसार आणखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे, ड्रोनच्या हालचाली कमी झाल्याचे दिसून येत असले तरी नागरिकांमध्ये या घटनेबाबत विविध तर्कवितर्कांना अद्यापही उधाण आले आहे.
Comments
Post a Comment