बेकायदेशीर ड्रोन उडवली रात्रीची झोप मात्र उडवणारे मास्टरमाईड कोण
ड्रोन।शिवाजी घाडगे
राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद आणि बेकायदेशीर ड्रोनच्या हालचालींनी नागरिकांची अक्षरशः झोप उडवली. सुरुवातीला एखाद-दुसरा ड्रोन दिसल्याच्या चर्चा होत असताना पुढे अनेक गावांतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी आकाशात फिरणारे ड्रोन दुष्टीपथास पडले . त्यामुळे भीती, संभ्रम आणि विविध तर्क-वितर्कांना उधाण आले.
गेल्या तीन-चार दिवसांत या ड्रोनच्या हालचालींमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच पोलीस प्रशासनाला तीन संशयित ड्रोन हस्तगत करण्यात यश आले असल्याने तपासाला दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. हे ड्रोन नेमके कोणी उडवले? त्यामागचा उद्देश काय होता? आणि रात्रीच्या अंधारात या हालचाली का केल्या जात होत्या? याची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.
या प्रकरणादरम्यान सोशल मीडियावर आणि गावोगावी अनेक अफवांनीही उंच भरारी घेतली. ज्याच्या त्याच्या परीने विविध तर्क मांडले गेले. काहींनी गुप्त सर्वेक्षणाचा दावा केला, तर काहींनी गुन्हेगारी हालचालींशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याही अफवेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांनी स्वतः लक्ष घातले. पुणे ग्रामीण पोलिसांकडील अँटी-ड्रोन पथकाला पाचारण करून ड्रोनचा माग काढण्याचा आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासाची चक्रे फिरू लागली असून हस्तगत करण्यात आलेल्या ड्रोनचे तांत्रिक विश्लेषणही करण्यात येणार आहे. त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घटनेचा एक सकारात्मक पैलूही समोर आला. रात्रीच्या वेळी परिसरात काय घडते याबाबत नागरिक अधिक सतर्क आणि जागरूक झाले. अनेक गावांमध्ये नागरिकांनी स्वतः निरीक्षण ठेवून पोलिसांना माहिती पुरविण्याचे काम केले. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
एक गोष्ट मात्र आता स्पष्ट झाली आहे की, हे ड्रोन केवळ छंद किंवा मनोरंजन म्हणून उडविले जात नव्हते. तसेच ते कोणत्याही नियमित शासकीय मोहिमेचा भाग नसल्याचेही जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या हालचालींमागे काही विशिष्ट उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज ड्रोनची संख्या कमी झाली, काही ड्रोन हस्तगत झाले आणि परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्याचे चित्र असले तरी या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार कोण, हा प्रश्न अद्याप कायम आहे. राहुरीकरांच्या मनातील संभ्रम आणि अस्वस्थता पूर्णपणे दूर होण्यासाठी केवळ ड्रोन जप्त होणे पुरेसे नाही; तर या प्रकरणामागील खरा ‘मास्टरमाईंड’ शोधून त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. तोपर्यंत बेकायदेशीर ड्रोनचे हे गूढ आणि त्यामागील रहस्य कायम चर्चेचा विषय राहणार आहे.
Comments
Post a Comment