अखेर भाजपाचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार झालेच...

अखेर प्राजक्त तनपरेआ यांना आमदारकीचा बिनविरोध गुलाल 
राजरंग।शिवाजी घाडगे 
अहिल्यानगर  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली
असून हा क्षण राहुरीच्या राजकीय इतिहासात सुर्वण अक्षरानी कोरला जाईल व राहुरीचे राजकारण पुन्हा तनपुरे कुटुंबा भोवती आले 
श्रध्दा व सबुरीचा फायदा प्राजक्त तनपुरे यांना झाला असून 
 उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर इतर सर्व प्रतिस्पर्धी मैदानातून बाहेर पडल्याने तनपुरे यांना बिनविरोध आमदार होण्याचा मान मिळाला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना इतक्या लवकर विधान परिषदेची संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना नव्हती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आणि त्याचे फलित बिनविरोध निवडीच्या रूपाने समोर आले.
दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात नगराध्यक्ष करण ससाणे, मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी यांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र दत्तात्रय पानसरे यांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवातीला नकार देत, सुचकाला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे काही काळ राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण झाला होता.
अखेर आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचेही सहकार्य लाभल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परिणामी सर्व अडथळे दूर झाले आणि प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
राहुरीच्या राजकारणात कमळाचे प्रतीक पुन्हा एकदा प्रभावीपणे फुलल्याचे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या काळात राहुरीत भाजपची झालेली राजकीय घोडदौड आता प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने नव्या टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.
प्राजक्त तनपुरे यांचा शांत, संयमी आणि संवादकुशल स्वभाव भाजप नेतृत्वाने योग्य वेळी ओळखला. त्यामुळे जिल्ह्यातील गुंतागुंतीच्या राजकीय समीकरणांमध्ये पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि बिनविरोध निवडीच्या माध्यमातून त्यांना विधान परिषदेपर्यंत पोहोचविले.
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड ही केवळ एका जागेची निवडणूक नसून जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची नोंद घेणारी घटना ठरली आहे. राजकारणात अनेकदा पराभव, संघर्ष आणि दीर्घ प्रतीक्षा यानंतर संधी मिळते; परंतु काही वेळा योग्य वेळ, योग्य निर्णय आणि अनुकूल राजकीय परिस्थिती यांचा संगम एखाद्या नेत्याला अपेक्षेपेक्षा मोठी झेप देऊन जातो. प्राजक्त तनपुरे यांच्या बाबतीतही काहीसे असेच घडले आहे.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय असलेले प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये दाखल झाले आणि अल्पावधीतच विधान परिषदेची आमदारकी त्यांच्या वाट्याला आली. राजकारणात पक्षांतराला अनेकदा संधीवादाचे लेबल लावले जाते, तर कधी त्यामागील राजकीय वास्तव स्वीकारले जाते. मात्र भाजपने तनपुरे यांच्यावर दाखविलेला विश्वास आणि त्यांना दिलेली संधी हे त्यांच्या राजकीय उपयुक्ततेचेही द्योतक आहे.
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत काही काळ निर्माण झालेला संभ्रमही लक्षवेधी ठरला. दत्तात्रय पानसरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेत थोडा तणाव निर्माण झाला होता. मात्र शेवटी सर्व पक्षीय संवाद, समन्वय आणि मध्यस्थीच्या राजकारणाने मार्ग काढला. यामुळे जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पडद्यामागे निभावलेली भूमिका देखील अधोरेखित झाली.
प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामागील कौटुंबिक राजकीय वारसा. आजोबा डॉ. बाबुराव तनपुरे, वडील प्रसाद तनपुरे आणि आता प्राजक्त तनपुरे अशा तीन पिढ्यांनी विधानमंडळापर्यंत पोहोचण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मात्र वारसा हा केवळ प्रवेशद्वार उघडतो; पुढील वाटचाल स्वतःच्या कर्तृत्वावरच करावी लागते, हेही तितकेच खरे आहे.
प्राजक्त तनपुरे यांचा शांत, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून असलेला चेहरा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. जिल्ह्यातील आक्रमक आणि संघर्षप्रधान राजकारणात संयम राखणे हे अनेकदा अधिक प्रभावी ठरते. भाजपनेही कदाचित याच गुणांची दखल घेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली असावी.
तथापि, खरी परीक्षा आता सुरू होत आहे. बिनविरोध निवडून येणे ही राजकीय यशाची सुरुवात असते; अंतिम यश नव्हे. विधान परिषद सदस्य म्हणून जिल्ह्याचे प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न, विकासकामे आणि पक्ष संघटनेच्या अपेक्षा यांचा समतोल साधावा लागणार आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या राजकीय संस्कृतीत स्वतःची भूमिका ठामपणे निर्माण करावी लागणार आहे.
अहिल्यानगरचे राजकारण हे नेहमीच सरळ रेषेत चाललेले नाही. येथे मैत्री आणि संघर्ष, युती आणि विरोध, स्वीकार आणि नाराजी यांची समीकरणे क्षणाक्षणाला बदलत असतात. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांना मिळालेली बिनविरोध आमदारकी ही जितकी सन्मानाची बाब आहे, तितकीच ती जबाबदारीचीही आहे.
राजकारणात गुलाल उधळण्याचे क्षण अल्पकाळ टिकतात; पण जनतेच्या अपेक्षांची धूळ कायम सोबत राहते. प्राजक्त तनपुरे यांनी बिनविरोध आमदारकीचा मान मिळविला आहे. आता या मानाचे जनतेच्या विश्वासात रूपांतर करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन