वृक्ष लागवड करुन पर्यावरण संरक्षण करा

 वृक्ष लागवड करा पर्यावरण वाचवा 
      संकल्प @शिवाजी घाडगे 
शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा नवीन उमेद, नवीन स्वप्ने आणि नवीन संकल्पांचा काळ असतो. अशा वेळी केवळ शैक्षणिक प्रगतीचा विचार न करता पर्यावरण संरक्षणाचाही संकल्प प्रत्येकाने करणे ही काळाची गरज बनली आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात सोपा, प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय आहे.
आज अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. काँक्रीटच्या जंगलात हिरवाई झपाट्याने कमी होत असून त्याचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागत आहेत. उन्हाळ्यातील वाढती उष्णता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील बदल ही त्याचीच उदाहरणे आहेत. त्यामुळे केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे.
 उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर सोमवारपासून शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत किमान पाच वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आम्ही करत आहोत. 
सध्या वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि तापमानवाढ यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. हा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात वृक्ष लागवडीसारख्या समाजोपयोगी उपक्रमाने करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच पर्यावरण संरक्षणाची आवड आणि जाणीव निर्माण झाल्यास भविष्यात हरित व समृद्ध पर्यावरण उभारणे शक्य होईल.
कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला ऑक्सिजनचे महत्त्व प्रकर्षाने जाणवले. त्या काळात वृक्षांचे पर्यावरण आणि मानवी जीवनातील योगदान अधोरेखित झाले. त्यामुळे केवळ वृक्ष लागवड न करता त्यांचे संगोपन करण्यावरही भर देणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी झाडे सुरक्षितपणे वाढू शकतील अशा मोकळ्या जागांमध्ये औषधी व आरोग्यदायी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड केल्यास त्याचा समाजाला अधिक लाभ होऊ शकतो.
वाढदिवस, कौटुंबिक समारंभ किंवा इतर विशेष प्रसंगी चॉकलेट, पुष्पगुच्छ अथवा इतर भेटवस्तू देण्याऐवजी वृक्ष भेट देण्याची संस्कृती रुजविण्याची आवश्यकता आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल आणि समाजात सकारात्मक संदेशही जाईल.
 सर्वानीच आता वृक्ष संवर्धनासाठी व्यापक जनजागृती करत प्रत्येक नागरिकाने किमान पाच वृक्ष लावून त्यांचे संगोपन केल्यास पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक प्रभावी होईल, असा विश्वास आहे. 
“कोणाची लावालावी करण्यापेक्षा वृक्ष लावणे अधिक महत्त्वाचे आहे. चला, वृक्षारोपणाची सुरुवात करून पर्यावरण संरक्षणाच्या या लोकचळवळीत सहभागी होऊया,” 

Comments