एलसीबी समोर विश्वासार्हतेचा संतोष कमी होईल का असंतोष
तरंग @शिवाजी घाडगे
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ही जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारी आणि संघटित गुन्ह्यांविरोधात कारवाई करणारी महत्त्वाची यंत्रणा मानली जाते. त्यामुळे या विभागाची प्रतिमा, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता अबाधित राहणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, गेल्या काही वर्षांत विविध वादग्रस्त घटनांमुळे एलसीबीबाबत जनमानसात प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.
अशा परिस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे एलसीबीची धुरा सोपविली आहे. मुटकुळे यांनी यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच युवकांमधील व्यसनाधीनता, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विषयांवर उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे आशावादी नजरेने पाहिले जात आहे.
परंतु एलसीबीचे नेतृत्व स्वीकारणे आणि त्या विभागाची प्रतिमा उंचावणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नव्या अधिकाऱ्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे जनतेचा आणि पोलीस दलाचा विश्वास पुन्हा मिळवणे. गुन्हेगारीविरोधातील कठोर कारवाई, तपासातील पारदर्शकता आणि कोणत्याही प्रकारच्या दबावापासून मुक्त निर्णयक्षमता या बाबींवरच एलसीबीचे भवितव्य अवलंबून असेल.
जिल्ह्यातील अवैध धंदे, मादक पदार्थांची तस्करी, संघटित गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांवर प्रभावी अंकुश ठेवण्याची जबाबदारी एलसीबीवर आहे. त्यामुळे केवळ बदली किंवा नियुक्ती हा उपाय नसून, कामगिरीतून विश्वास निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. जनतेला अपेक्षा आहेत त्या निकालांच्या, कारवायांच्या आणि गुन्हेगारांवर होणाऱ्या प्रभावी अंकुशाच्या.
एलसीबीमध्ये नियुक्तीसाठी नेहमीच स्पर्धा असते. कारण हा विभाग प्रतिष्ठेचा आणि प्रभावाचा मानला जातो. मात्र, या प्रतिष्ठेला न्याय देण्यासाठी निष्पक्षता, प्रामाणिकपणा आणि परिणामकारकता यांची जोड आवश्यक आहे. संतोष मुटकुळे यांच्या नियुक्तीमुळे निर्माण झालेल्या अपेक्षा मोठ्या आहेत. आता त्या अपेक्षांचे रूपांतर जनतेच्या समाधानात आणि विभागाच्या विश्वासार्हतेत होते का, हे येणारा काळच ठरवेल.
अखेर कोणत्याही विभागाची खरी ओळख त्याच्या अधिकाऱ्यांच्या नावाने नव्हे, तर त्यांच्या कामगिरीने निर्माण होत असते. त्यामुळे अहिल्यानगर एलसीबीसमोरील खरे आव्हान हे केवळ गुन्हेगारांविरोधात नाही, तर स्वतःची विश्वासार्हता अधिक मजबूत करण्याचे आहे.
मागील काही काळात विविध वाद आणि चर्चांनी जोर धरला होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता पुन्हा प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान नव्या नेतृत्वासमोर उभे राहिले आहे. जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस दलातील काही घटकांकडूनही एलसीबीने अधिक पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, यापूर्वी एलसीबीचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडे यांची शिर्डी साईबाबा मंदिर सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळातही काही घटनांमुळे चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता नव्या नियुक्तीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या कामकाजात काय बदल होतात आणि जनतेच्या अपेक्षांवर नवे नेतृत्व कितपत खरे उतरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, एलसीबीमधील या नियुक्तीसाठी विविध स्तरांवर चुरस असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली होती. अखेर संतोष मुटकुळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा नव्या जोमाने काम करेल का, तसेच निर्माण झालेला असंतोष दूर करून जनतेचा विश्वास संपादन करेल का, याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे
Comments
Post a Comment