पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना एलसीबीचा मोह सुटेना

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना स्थानिक गुन्हे शाखेचा मोह सुटेना?
तरंग @शिवाजी घाडगे 
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय बदल्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी पुन्हा चर्चेत आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अलीकडेच जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या. त्यामध्ये पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची शिर्डी साईबाबा मंदिर सुरक्षा विभागात बदली करण्यात आली.
मात्र, या बदली आदेशाविरोधात कबाडी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) येथे दाद मागितल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, जिल्हा पोलीस प्रशासनानेही या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मॅटसमोर कॅव्हेट दाखल केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा वाद केवळ बदलीपुरता मर्यादित न राहता प्रशासकीय चर्चेचा विषय बनला आहे.
कबाडी यांनी आपला कार्यकाल पूर्ण झालेला नसल्याचे कारण देत बदलीला आक्षेप घेतला असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलीस खात्यातील बदल्या या प्रशासकीय गरजेनुसार केल्या जातात आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना उपलब्ध मनुष्यबळाचा आवश्यकतेनुसार वापर करण्याचे अधिकार असतात. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याने विशिष्ट शाखेतच राहण्याचा आग्रह धरणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याच काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पोलीस शिपाई शामसुंदर गुजर यांच्यावर कस्टडीतील अमली पदार्थ चोरून विकल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात पुणे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीसांनी कारवाई केली असून संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच दुध भेसळ आणि ऑनलाइन मल्टिस्टेट आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही प्रकरणांमध्येही विविध स्तरांवर चर्चा रंगली होती. या सर्व घटनांमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पोलीस निरीक्षक हे जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय यंत्रणेचा भाग असतात. त्यांची नियुक्ती आणि पदस्थापना ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होत असते. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही ठिकाणी त्यांची नेमणूक केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत शिर्डीसारख्या जागतिक कीर्तीच्या धार्मिक स्थळाच्या सुरक्षा व्यवस्थेत काम करण्याची संधी ही अनेक अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाते.
दरवर्षी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अशा संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणे हे देखील मोठे आव्हान आणि सन्मानाचे पद मानले जाते. त्यामुळे या बदलीला विरोध करण्यामागील नेमकी कारणे काय आहेत, याबाबत पोलीस वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत.
शेवटी, बदली हा शासकीय सेवेतला अविभाज्य भाग आहे. कोणत्याही अधिकाऱ्याची खरी ओळख ही तो कोणत्या शाखेत काम करतो यापेक्षा त्याने दिलेल्या सेवेमुळे आणि केलेल्या कामगिरीमुळे ठरत असते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचा मोह की प्रशासकीय तत्त्वांचा प्रश्न, याचे उत्तर काळच देईल.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन