खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कपाळी कोणाचा टिळा

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कपाळी कोणाचा टिळा?
राजरंग।शिवाजी घाडगे 
माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील काही खासदारांबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून, तथाकथित "ऑपरेशन टायगर"मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचेही नाव घेतले जात आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे येणारा काळ स्पष्ट करेल, मात्र मतदारसंघात त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय प्रवास चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. सेवेतून निवृत्तीनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि शिवसेनेच्या उमेदवारीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक घडामोडी घडल्या. एका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय नशीब आजमावले, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतु तेथेही पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, शिर्डी मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सलग दहा वर्षे शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर त्यांनी सत्ताधारी गटाची वाट धरली. त्यानंतर शिवसेनेने भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली आणि मतदारांनीही त्यांना भरघोस पाठिंबा देत पुन्हा संसदेत पाठवले.
मात्र आता पुन्हा एकदा वाकचौरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मतदारसंघात ते शिवसेनेपासून दूर जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांच्या समर्थकांकडून हा निर्णय मतदारसंघाच्या विकासासाठी असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांशी जवळीक ठेवल्यास विकासकामांना गती मिळू शकते, निधी सहज उपलब्ध होऊ शकतो आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागू शकतात, असा युक्तिवाद केला जात आहे.
दुसरीकडे, अनेक शिवसैनिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यांच्या मते, पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर पक्षाशी निष्ठा राखणे हे लोकप्रतिनिधीचे नैतिक कर्तव्य असते. त्यामुळे संभाव्य पक्षांतर किंवा सत्ताधारी गटाशी जवळीक वाढवण्याच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
राजकारणात सत्तेची समीकरणे सतत बदलत असतात. विरोधी बाकांवर बसून संघर्ष करण्यापेक्षा सत्तेच्या जवळ राहून मतदारसंघाचा विकास साधण्याचा मार्ग अनेक लोकप्रतिनिधी निवडतात. भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबाबतही अशीच भूमिका पुढे येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या कपाळावर निष्ठेचा टिळा लागणार की विकासाच्या नावाखाली सत्तेचा टिळा, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
वय, आरोग्य आणि बदलती राजकीय परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून ते पुढील निर्णय घेत असतील, अशीही चर्चा आहे. मात्र त्यांचा संभाव्य निर्णय योग्य की अयोग्य, याचे खरे मूल्यमापन राजकीय विश्लेषक किंवा विरोधक नव्हे तर मतदारच करतील. शिर्डी मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास कायम राहतो की नाही आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला किती पाठिंबा मिळतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. सध्या तरी शिर्डीच्या राजकारणात एकच प्रश्न चर्चिला जात आहे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कपाळी अखेर कोणाचा टिळा लागणार मतदार संघाचे भवितव्य की मुलाचे भवितव्य म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौर हा निर्णय घेत आहेत अशी चर्चा आहे तर दुसरीकडे शिवसेना नेते उध्दव ठाकरे देव माणूस आहे तर तुम्ही व्हिलन का बनत आहेत 
पक्षांतर बंदी कायद्याची टांगती तलवार देखील आहेच कायद्याने संबंधित ६ खासदाराना कोणत्याही पक्षात परस्पर विलिन होण्याचा अधिकार नाही दोन-तृतीयांश म्हणजे ९पैकी ६ बहुमत असले तरी मुळ राजकीय पक्ष स्वतः दुसर्‍या पक्षात निर्णय घेत नाही तो पर्यंत शक्य नाही आणि मुळ पक्षाचा व्हिप चे उलघन करु शकत नाही 
एक तर यांना निवडणूक आयोगाकडे जाऊन स्वतःलाच मुळ पक्ष म्हणून मान्यता मिळावी लागेल 
त्यामुळेच पूर्वी ग्रामपंचायत अथवा स्थानिक विकास सोसायटीत जसे राजकारण चालायचे असे दिल्लीत चालु झाले असे लोक उपहासाने बोलू लागलेत 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन