शब्दांची मशाल हाती घेत शिवसेनेची मशागत करणारे दंगलकार कवी चंदनशिवे
राजरंग।शिवाजी घाडगे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिन सोहळ्यात आपल्या प्रभावी आणि रोखठोक भाषणाने संपूर्ण सभागृह भारावून टाकणारे कवी नितीन चंदनशिवे हे सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, एका क्षणात ते राज्यभरातील शिवसैनिकांसह सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.
चंदनशिवे यांच्या भाषणातील शब्दांमध्ये केवळ आक्रमकता नव्हती, तर शिवसेनेच्या विचारधारेबद्दलची निष्ठा, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील भावनिक जिव्हाळाही प्रकर्षाने दिसून आला. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेला विचारांचा वारसा, पत्नीच्या निधनानंतरही तिचा फोटो जवळ बाळगणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा संवेदनशील पैलू आणि कोरोना काळात सामान्य जनतेसाठी धावून आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य त्यांनी आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले.
याचबरोबर त्यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांनाही महाराष्ट्रभर अधिक जोमाने फिरण्याचा सल्ला दिला. त्यांच्या भाषणातील अनेक वाक्ये उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उचलून धरली. विशेषतः त्यांच्या ग्रामीण बोलीतील रोखठोक शैलीने शिवसैनिकांना भावनिक केले. त्यामुळे सभागृहात अनेकदा उत्स्फूर्त दाद मिळताना दिसली.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात चंदनशिवे यांनी आपल्या शब्दांच्या सामर्थ्याने असे वातावरण निर्माण केले की, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या गेल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. त्यांच्या भाषणात केवळ व्यक्तिपूजा नव्हती, तर संकटाच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा संदेश होता
राजकारणात नेते घडविण्यासाठी संघटना लागते, निवडणुका जिंकण्यासाठी पैसा लागतो, सत्ता मिळवण्यासाठी समीकरणे लागतात; मात्र जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी शब्दांची ताकद लागते. आपल्या प्रभावी भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे कवी नितीन चंदनशिवे हे याच शब्दशक्तीचे जिवंत उदाहरण ठरत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सध्या आपल्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. पक्षफुटीनंतर अनेक नेते, आमदार आणि खासदारांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्या. अशा कठीण काळात पक्षाला केवळ राजकीय नव्हे तर वैचारिक आणि भावनिक आधाराचीही गरज आहे. ही उणीव भरून काढण्याचे काम काही प्रमाणात नितीन चंदनशिवे यांच्यासारखे कवी करतोय
त्यांनी केलेले भाषण हे केवळ कौतुकाचे नव्हते, तर ते शिवसेनेच्या वैचारिक प्रवासाचे स्मरण होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक विचारांपासून ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय नेतृत्वापर्यंत आणि कोरोना काळात राज्याला धीर देणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेपर्यंतचा प्रवास त्यांनी आपल्या शब्दांत उभा केला. त्यामुळे हे भाषण केवळ राजकीय भाषण न राहता भावनिक संवाद बनले.
हल्ली राजकारणात कार्यकर्त्यांची निष्ठा आणि विचारांवरील श्रद्धा कमी होत चालल्याची टीका वारंवार केली जाते. निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्षांतर करतात, सत्तेच्या समीकरणानुसार भूमिका बदलतात आणि मतदारांपेक्षा राजकीय फायद्यांना अधिक महत्त्व देतात, अशी जनमानसातील भावना आहे. अशा वेळी कोणतेही पद, सत्ता किंवा राजकीय लाभ नसताना एखादा कवी पक्षाच्या विचारांसाठी व्यासपीठावर उभा राहतो आणि हजारो कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करतो, हे निश्चितच वेगळे चित्र आहे.
नितीन चंदनशिवे यांच्या भाषणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ग्रामीण, साधी आणि थेट शैली. ते अलंकारिक भाषा वापरत नाहीत, तर जनतेच्या बोलीभाषेत संवाद साधतात. त्यामुळे त्यांचे शब्द शिवसैनिकांच्या मनाला भिडले. त्यांच्या भाषणात आक्रमकता होती, विनोद होता, उपरोध आहे; पण त्याचबरोबर भावनिक जिव्हाळाही आहे. त्यामुळेच त्यांच्या भाषणातील अनेक ओळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतआहेत.
विशेष म्हणजे त्यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांनाही अधिकजोमाने महाराष्ट्रभर फिरण्याचा सल्ला दिला. ही भूमिका अंधभक्तीची नसून संघटनेच्या भविष्यासाठीची चिंता व्यक्त करणारी होती. खऱ्या अर्थाने पक्षनिष्ठ कार्यकर्ता हा केवळ टाळ्या वाजवणारा नसतो, तर योग्य वेळी मार्गदर्शन करणारा आणि वास्तव दाखवणारा असतो. चंदनशिवे यांच्या भाषणातून हाच संदेश उमटताना दिसला.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे वक्ते झाले. काहींनी आपल्या भाषणांनी निवडणुका जिंकल्या, तर काहींनी विचारांची चळवळ उभी केली. नितीन चंदनशिवे यांचे नाव कोणत्या श्रेणीत जाईल हे काळ ठरवेल. मात्र आजच्या घडीला त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे, हे नाकारता येणार नाही.
राजकीय पक्षांची खरी ताकद केवळ निवडून आलेल्या प्रतिनिधींमध्ये नसते, तर विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये असते. अनेक खासदार, आमदार आणि नेते पक्ष सोडून जात असताना शब्दांची मशाल हाती घेऊन विचारांची मशागत करणारे लोक उभे राहत असतील, तर कोणत्याही पक्षाचे अस्तित्व सहज संपत नाही. नितीन चंदनशिवे यांच्याविषयी आज होत असलेली चर्चा ही केवळ एका भाषणाची नाही, तर विचारांशी निष्ठावंत राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या शक्तीची आहे.
म्हणूनच शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानंतर महाराष्ट्रात एखाद्या नेत्यापेक्षा एका कवीची अधिक चर्चा होत असेल, तर त्यामागे शब्दांची ताकद आणि विचारांवरील निष्ठा हेच खरे कारण असल्याचे मानावे लागेल.
Comments
Post a Comment