व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वानी पुढे यावे-संभापती प्रा राम शिदे

व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे : सभापती प्रा. राम शिंदे
घाडगे न्यूज ।प्रतिनिधी
तरुण हे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, तसेच व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. "एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य – व्यसनमुक्त जिल्ह्याकडे एक सामूहिक पाऊल" या संकल्पनेवर आधारित या अभियानानिमित्त शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'नशामुक्त भारत' या संकल्पनेचा उल्लेख करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती केली जात असल्याचे सांगितले. तरुणांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, कला, उद्योग आणि समाजसेवा यांसारख्या सकारात्मक क्षेत्रांत स्वतःला घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने राबविलेल्या या अभियानाचेही त्यांनी कौतुक केले.
प्रा. राम शिंदे म्हणाले, "तरुणांची ऊर्जा, बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व हे राष्ट्राच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत. मात्र अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे अनेक तरुणांचे शिक्षण, करिअर, आरोग्य आणि कुटुंबाचे सुख धोक्यात येत आहे. अहिल्यानगरचे भविष्य उज्ज्वल असेल, तरच राज्याचे आणि पर्यायाने देशाचे भविष्य उज्ज्वल राहील. तरुणांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन चुकीच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींबाबत पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे. व्यसनाला नव्हे, तर आपल्या स्वप्नांना होकार द्या."
आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले की, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या अभियानाचे अत्यंत प्रभावी आयोजन केले असून, त्यातून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण होईल. तरुणांनी व्यसनाकडे न वळता आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहावे.
आमदार काशिनाथ दाते म्हणाले, "व्यसन ही समाजाला लागलेली घातक कीड आहे. देशातील तरुणांनी आपले ध्येय निश्चित करून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे."
प्रास्ताविकात जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी सांगितले की, व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. "तरुण हे देशाचे भविष्य आहेत. 'नशामुक्त भारत' हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. समाजमाध्यमांचा वापर केवळ वैयक्तिक विकासासाठी करावा आणि त्यांचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले.
अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन