वाॅक फाॅर वॉटर अभियान

महा वॉकेथॉन २०२६ – ‘वॉक फॉर वॉटर’

२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन; जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व जन सामान्यांपर्यंत पोहोचविण्या साठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात 
 ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’  या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करून त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आले आहे. 
या उपक्रमाची ‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमॉरो’
 ही संकल्पना असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य देण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांनी जास्तीत जास्त ३ किलोमीटर अंतराची वॉकॅथॉन पूर्ण करायची असून त्यानंतर मृदसंधारण आणि जलसंधारणाची सामूहिक शपथ घेण्यात येणार आहे.
जलसंधारण दिनानिमित्त विविध उपक्रम
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यभर जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पाणी ही भविष्यातील पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती असून त्याचे संवर्धन, पुनर्भरण आणि योग्य व्यवस्थापन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे.
याच उद्देशाने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जलसंधारणाच्या विविध उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम आणि लोकसहभागातून पाण्याच्या संवर्धनाला चालना देण्यात येणार आहे.

सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग
२१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’मध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग राहणार आहे.
राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी करणार आहेत.

या उपक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, संसद व विधिमंडळाचे सदस्य, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य यांना सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रशासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, नामांकित व्यक्ती, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचाही सहभाग अपेक्षित आहे.
विद्यार्थी, युवक आणि स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग
महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, विविध स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब, रनिंग व सायकलिंग क्लब, क्रीडा संघटना, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, व्यायामशाळा आणि विविध ‘गुड मॉर्निंग ग्रुप्स’ यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

महिला तसेच समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणी

‘महा वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड आधारित ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

जलसंधारण हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आजपासूनच पाणी बचत, पाण्याचे पुनर्भरण, मृदसंधारण आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून हा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
“पाणी वाचवा, माती वाचवा आणि भविष्यातील पिढ्यांचे जीवन सुरक्षित करा”, या संदेशासह राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘महा वॉकेथॉन’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन