वकील रस्त्यावर येत म्हणतायत खड्डे आहेत मायलॉर्ड
घाडगे न्यूज।प्रतिनिधी
नगर–मनमाड महामार्गाचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, या मागणीसाठी राहुरी वकील संघाने मंगळवारी आक्रमक भूमिका घेत भर पावसात रास्ता रोको आंदोलन केले. ‘महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत, मायलॉर्ड... आता तरी शासनाने या रस्त्याकडे गांभीर्याने पाहावे,’ अशा संतप्त भावना व्यक्त करत वकील बांधव-भगिनींनी शासनाचे लक्ष महामार्गाच्या दुरवस्थेकडे वेधले.
गेल्या अनेक वर्षांपासून नगर–मनमाड महामार्गाच्या कामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. या महामार्गाच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही प्रवाशांना मात्र खड्डे, धुळीचा त्रास, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आता अधिक अंत न पाहता महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
राहुरी येथील ग्रीन हॉटेल चौकात झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते. भर पावसातही आंदोलन सुरू ठेवत वकिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाला नागरिक, शेतकरी संघटना तसेच वाहन संघटनांनी देखील पाठिंबा दिला.
नव्याने केलेल्या रस्त्यावरही खड्डे
नगर–मनमाड महामार्गाची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी नव्याने रस्ता तयार करण्यात आला; मात्र काही दिवसांतच त्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महामार्गाच्या कामावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना रस्त्याची अवस्था सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच खराब होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याच्या कामाचा दर्जा, ठेकेदाराची कार्यपद्धती आणि कामावर संबंधित यंत्रणांचे नियंत्रण याबाबतही आंदोलनकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
जीव मुठीत धरून प्रवास
खराब रस्त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकविताना वाहनांचा तोल जाणे, अचानक ब्रेक लावल्याने अपघात होणे तसेच अवजड वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होणे, अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. या मार्गावर वारंवार अपघात होऊन जीवितहानी झाल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
महामार्ग हा केवळ वाहतुकीचा मार्ग नसून, नगर, राहुरी, मनमाड आणि परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच औद्योगिक आणि कृषी वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या मार्गाची दुरवस्था ही केवळ वाहनचालकांची समस्या नसून संपूर्ण परिसराच्या विकासाशी निगडित प्रश्न आहे, अशी भूमिका वकिलांनी मांडली.
काम तातडीने आणि गुणवत्तापूर्ण करा
महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, रस्त्याची दुरुस्ती तात्पुरती न करता कायमस्वरूपी व टिकाऊ पद्धतीने करावी, संबंधित ठेकेदाराला आवश्यक आदेश द्यावेत आणि आतापर्यंत झालेल्या कामाच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
‘रस्त्यावर केवळ डांबर टाकून खड्डे बुजविण्याचा उपचार नको; दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता हवा,’ अशी स्पष्ट भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. महामार्गाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनाला विविध घटकांचा पाठिंबा
या आंदोलनाला शेतकरी सेनेचे रवी मोरे, किरण कडू, देवेंद्र लांबे, निलेश शिरसाठ, प्रकाश देठे, अर्थव म्हसे, सुनील विश्वासराव तसेच विविध वाहन संघटनांनी पाठिंबा दर्शविला.
रास्ता रोको आंदोलनामुळे नगर–मनमाड महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागले.
वकील संघटनेच्या निवेदनावर सह्या
या मागण्यांचे निवेदन वकील संघटनेच्या वतीने देण्यात आले. निवेदनावर ॲड. भागवत उर्हे, प्रवीण पागिरे, महेश साठे, आर. डी. बाचकर, के. जी. मुसमाडे, एस. के. भंडारी, एस. बी. विधाटे, प्रकाश संसारे, सुंदरबापू माने, सविता गांधले, सुरज बिहाणी, एल. बी. किनकर, ऋषिकेश मोरे, संदीप खपके, के. टी. चितळकर, भाऊसाहेब पवार, अमोल डौले, तुषार ढवळे यांच्यासह अण्थ स्वाक्षऱ्या आहेत.
नगर–मनमाड महामार्गाची दुरवस्था तातडीने दूर करून प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता उपलब्ध करून द्यावा. महामार्गाचे काम आणखी लांबणीवर न टाकता निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
‘कोट्यवधींचा खर्च झाला, आता खड्ड्यांचा प्रवास नको; नगर–मनमाड महामार्ग पूर्ण झालाच पाहिजे,’ असा निर्धार व्यक्त करत राहुरीतील वकील संघाने आंदोलनातून शासनाला स्पष्ट संदेश दिला.
Comments
Post a Comment