श्रीरामपूरा अंमली पदार्थ जनजागृती फेरी निर्धार व्यसनमुक्तीतीचा
श्रीरामपूरात अंमली पदार्थविरोधी जनजागृती फेरी
घाडगे न्यूज। प्रतिनिधी
अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून युवक-युवतींना दूर ठेवण्यासाठी आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीरामपूर शहरात शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) अंमली पदार्थविरोधी जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘निर्धार व्यसनमुक्तीचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या फेरीत युवक, युवती, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीरामपूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून पुढे नेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर शहरात या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता आर.बी.एन. महाविद्यालयातून जनजागृती फेरीला प्रारंभ होणार आहे. फेरीच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे सेवन, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, युवकांचे भविष्य आणि कुटुंबव्यवस्थेवर होणारे परिणाम याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश देत समाजात व्यसनमुक्तीची सकारात्मक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
आजच्या काळात अंमली पदार्थांचा वाढता प्रसार ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या न राहता सामाजिक आणि कौटुंबिक आव्हान बनले आहे. विशेषतः तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी पालक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही जनजागृती फेरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
‘व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार’ हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी या फेरीत सहभागी व्हावे. युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंमली पदार्थविरोधी अभियानाला पाठबळ द्यावे, असे आवाहन श्रीरामपूर शहर पोलिसांनी केले आहे.
अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा केवळ पोलिसांचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. त्यामुळे ‘निर्धार व्यसनमुक्तीचा’ या अभियानाच्या माध्यमातून श्रीरामपूरसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्याच्या प्रयत्नांना नागरिकांनी सक्रिय सहभागातून बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment