गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहात रंग न बदलनारा भला मोठा सरडा
भाष्य।शिवाजी घाडगे
प्रत्येक वर्षी गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह आयोन जिल्ह्यात होत असते या वर्षी धनगरवाडी येथे हा सप्ताह सुरु असुन या ठिकाणी कृषीप्रर्दशन भरले असून यात तब्बल २१किलो वजनाचा सरडा पाहायला मिळतोय
मोठ्या भक्तिभावाने गंगागिरी महाराज १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाला केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक उपस्थित राहतात. भक्ती, श्रद्धा, सेवा, सामाजिक एकोपा आणि संतपरंपरेचे दर्शन घडविणारा हा सप्ताह आता एक मोठी धार्मिक आणि सामाजिक परंपरा बनला आहे.
बहुजन समाजातील सर्वसामान्य माणसाला अध्यात्माची गोडी लागावी, त्याला भक्तीच्या माध्यमातून एकत्र आणता यावे आणि त्याचबरोबर त्याला गोडधोड महा प्रसाद मिळावा, या हेतूने महंत गंगागिरी महाराज यांनी या हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. पुढे नारागिरी महाराज यांनी ही परंपरा अखंड सुरू ठेवली आणि आता रामगिरी महाराज ती पुढे नेत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने सुरू आहे.
यावेळेस धनगरवाडी येथे सप्ताहा सुरु आहे लोकसहभाग. सप्ताहासाठी परिसरातील अनेक गावांमधून नागरिक आपल्या घरातून भाकरी, धान्य आणि इतर साहित्य प्रसादासाठी पाठवतात. ‘आपल्या घरची भाकरी दुसऱ्या भाविकाच्या पोटात जावी’, या भावनेतून सामान्य माणूस या सोहळ्याशी जोडला जातो. लाखो भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करावी लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर आमटी तयार करावी लागते. ती वाटपा टँकरची आवश्यकता भासते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक या सप्ताहाचा लाभ घेतात.
या सप्ताहात हरिनाम, कीर्तन, प्रवचन आणि संतविचारांचा गजर असतो. भक्तीच्या वातावरणात काही काळासाठी का होईना, माणूस आपली धावपळ, चिंता आणि अहकार बाजूला ठेवतो. संतांचे विचार ऐकून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळावी हा उदात्त हेतु त्यामुळे सप्ताहांचे महत्त्व आजच्या काळात देखील टिकून आहे.
मात्र यंदाच्या सप्ताहात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या एका अनोख्या पाहुण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कृषी प्रदर्शनात तब्बल २१ किलो वजनाचा सरडा ठेवण्यात आला असून त्याची मोठी चर्चा होत आहे. या सरड्याला पाहण्यासाठी भाविक आणि नागरिक उत्सुक आहेत. प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवरही या सरड्याची चर्चा झाल्याने काही वेळा मूळ हरिनाम सप्ताहापेक्षा सरडाच अधिक ‘फोकस’मध्ये आल्याचे चित्र दिसत आहे.
पण या सरड्याची एक गंमत आहे. सरडा म्हटले की आपल्याला रंग बदलणारा प्राणी अशी प्रतिमा आठवते. मात्र हा २१ किलोचा सरडा रंग बदलणारा नाही. आणि याच ठिकाणी या सरड्याची तुलना सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशी करण्याचा मोह आवरत नाही.
हा सरडा रंग बदलत नाही; पण माणसे मात्र परिस्थितीनुसार रंग बदलताना दिसतात!
विशेषतः राजकारणात तर रंग बदलण्याचे अनेक नमुने रोज पाहायला मिळतात. कालपर्यंत ज्यांच्यावर जोरदार टीका केली जाते, त्यांच्याबरोबरच दुसऱ्या दिवशी व्यासपीठावर हसतमुखाने उभे राहण्याची वेळ येते. काल ज्यांना विरोधक म्हटले, त्यांनाच आज मित्र म्हणावे लागते. सत्ता कोणाच्या हातात आहे, यावर अनेकांची भाषा आणि भूमिका बदलताना दिसते. त्यामुळे ‘राजकारणात काहीही कायमचे नसते’ असे म्हटले जाते.
मात्र प्रश्न एवढाच नाही की राजकीय लोक रंग बदलतात. आज अध्यात्मिक क्षेत्राकडेही पाहिले तर काही ठिकाणी राजकारणाचा प्रभाव वाढत चालल्याचे जाणवते. ज्या व्यासपीठावर हरिनामाचा गजर व्हावा, संतांचे विचार ऐकवले जावेत, समाजातील अंधश्रद्धा, व्यसन, व्यभिचार, हुंडा, शेतकरी समस्या, शिक्षण आणि संस्कार यावर प्रबोधन व्हावे, त्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तींचा उदोउदो अधिक होऊ लागला तर निश्चितच विचार करण्याची वेळ आली आहे.
राजकीय नेत्यांना सप्ताहाच्या व्यासपीठावर बोलावू नये, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी लोकप्रतिनिधी, दाते आणि समाजातील विविध घटकांचे सहकार्य आवश्यक असते. सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी मोठा खर्च येतो. लाखो भाविकांची भोजनव्यवस्था, पाणी, वाहतूक, सुरक्षा, निवास, स्वच्छता आणि इतर व्यवस्था करणे हे मोठे आव्हान असते. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचे सहकार्य घेणे ही गरज आहे.
परंतु सहकार्य आणि स्तुती यामध्ये फरक असतो.
सहकार्य करणाऱ्या व्यक्तीचे आभार मानणे योग्य आहे; मात्र त्याच व्यक्तीचे राजकीय महत्त्व वाढविण्यासाठी धार्मिक व्यासपीठाचा वापर होऊ लागला तर त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. कारण हरिनाम सप्ताह हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. तो एखाद्या नेत्याचा कार्यक्रम नाही. तो लाखो भाविकांचा आणि संतपरंपरेचा कार्यक्रम आहे.
आजचा सामान्य भाविक सप्ताहात येतो तो राजकारण ऐकण्यासाठी नव्हे, तर मनाला समाधान देणारे संतविचार ऐकण्यासाठी. तो येतो तो हरिनामाच्या गजरात सहभागी होण्यासाठी. गावातून भाकरी पाठविणारा शेतकरी, स्वतःच्या घरातील धान्य देणारा सामान्य नागरिक आणि सेवा करणारा स्वयंसेवक यांची श्रद्धा ही कोणत्याही राजकीय रंगापेक्षा मोठी आहे.
म्हणूनच २१ किलोच्या सरड्याने एक वेगळाच संदेश दिल्यासारखे वाटते. सरडा रंग बदलत नाही, मग माणसांनी तरी आपल्या विचारांचा रंग इतक्या सहजपणे का बदलावा?
अध्यात्म माणसाला स्थिरता शिकवते. संतपरंपरा सत्य, सेवा, संयम आणि त्याग शिकवते. हरिनाम म्हणजे केवळ नामस्मरण नव्हे; तर माणसाने माणसाशी जोडले जाणे, अहंकार बाजूला ठेवणे आणि समाजासाठी काहीतरी करणे हा त्याचा खरा अर्थ आहे. त्यामुळे अध्यात्मिक व्यासपीठाचा मूळ रंग हा भक्ती आणि समाजप्रबोधनाचा असला पाहिजे.
राजकारण येईल, राजकीय नेते येतील, सत्ता बदलेल, चेहरे बदलतील आणि समीकरणेही बदलतील. परंतु संतांची शिकवण बदलता कामा नये. हरिनामाचा गजर कोणत्याही राजकीय घोषणांपेक्षा मोठा राहिला पाहिजे. सामान्य भाविकाची श्रद्धा कोणत्याही राजकीय प्रसिद्धीपेक्षा महत्त्वाची राहिली पाहिजे.
धनगरवाडीचा हरिनाम सप्ताह हा याच लोकभावनेचा मोठा उत्सव आहे. लाखो भाविकांची उपस्थिती, गावोगावातून येणारा भाकरीचा प्रसाद, भोजनाची भव्य व्यवस्था आणि संतपरंपरेचा वारसा हेच या सप्ताहाचे खरे वैभव आहे. २१ किलोचा सरडा आकर्षणाचा विषय ठरला तरी तो हरिनाम सप्ताहाच्या मूळ उद्देशावर हावी होऊ नये, एवढीच अपेक्षा.
कारण शेवटी प्रश्न सरड्याच्या रंगाचा नाही; आपल्या विचारांच्या रंगाचा आहे.
सरडा रंग बदलत नाही, ही निसर्गाची गंमत आहे; पण माणसांनी स्वार्थासाठी रंग बदलणे ही समाजाची शोकांतिका ठरू नये. अध्यात्मिक व्यासपीठाने राजकीय रंगांपासून स्वतःला शक्य तितके अलिप्त ठेवून भक्ती, सेवा, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा रंग कायम ठेवला तर अशा सप्ताहाचे महत्त्व आणखी वाढेल.
म्हणून या वर्षीच्या हरिनाम सप्ताहातील २१ किलोचा सरडा पाहताना एकच विचार मनात येतोसरडा रंग बदलत नाही; हरिनाम सप्ताहाचाही रंग बदलू नये. तो भक्तीचा, सेवाभावाचा, माणुसकीचा आणि समाजप्रबोधनाचा रंग कायम राहावा.
हाच या भव्य धार्मिक परंपरेचा खरा संदेश ठरेल आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेलाही तो न्याय देईल.
Comments
Post a Comment