साहित्य ,संस्कृतीच्या वारशाने सहकाराची चळवळ समृद्ध बनवू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
घाडगे न्यूज। प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे प्रेरणास्थान असून, ग्रामविकासाचा आदर्श नमुना म्हणून ‘प्रवरा मॉडेल’ची देशभरात ओळख निर्माण झाली आहे. सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे ऐतिहासिक कार्य सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी केले. त्यांनी उभा केलेला हा विचार आणि वारसा पुढे नेत सहकार चळवळीला साहित्य, कला आणि संस्कृतीची जोड देऊन ती अधिक समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी केले.
प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव, प्रबोधन आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार आशुतोष काळे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार संग्राम जगताप, आमदार अमोल खताळ, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील, शालिनी विखे-पाटील, अविनाश आदिक, अनुराधा नागवडे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, प्रवरानगरची ओळख केवळ साखर उत्पादनापुरती मर्यादित नाही. शिक्षण, रोजगार, ग्रामविकास, सहकार आणि सामाजिक परिवर्तन या सर्वच क्षेत्रांत प्रवरानगरने आदर्श निर्माण केला आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे स्वप्न डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
“विठ्ठलराव विखे-पाटील यांनी निर्माण केलेला सहकाराचा वारसा केवळ आर्थिक विकासाचा नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाचा वारसा आहे. या वारशाला साहित्य, कला आणि संस्कृतीची जोड मिळाल्यास समाज अधिक संवेदनशील, सुसंस्कृत आणि समृद्ध होईल,” असेही त्यांनी सांगितले.
जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आपल्या लेखनातून समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांना आवाज देण्याचे काम केले आहे. प्रतिभावंतांचा सन्मान करण्याची प्रवरानगरची परंपरा कौतुकास्पद असून, अशा पुरस्कारांमुळे समाजहितासाठी लेखन करणाऱ्या साहित्यिकांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. सहकाराची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी साहित्य आणि संस्कृतीचा वारसा जपणे आवश्यक आहे, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.
पुरस्कारांची अखंड परंपरा
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची अखंड परंपरा गेल्या ३६ वर्षांपासून सुरू आहे. राज्यभर शेतकरी दिन साजरा होत असताना विखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त साहित्यिक, कलाकार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
विठ्ठलराव विखे-पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणले. त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळावी आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने पुरस्कारांची ही परंपरा सातत्याने पुढे नेली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रवरेच्या काठाने नवा माणूस घडविला”
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले की, प्रवरा नदीच्या काठावर उभ्या राहिलेल्या साखर कारखान्याबरोबरच येथे ‘नवा माणूस’ घडविण्याचे काम झाले. समाज, साहित्य आणि संस्कृतीला बळ देणाऱ्या डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.
“नैतिकतेवर राजकारणाचा पाया असण्याची परंपरा या मातीत आहे. समाजहितासाठी लेखन करणाऱ्या साहित्यिकांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे आहे. या पुरस्कारातून माझ्या लेखनाचा नव्हे, तर समाजातील शोषित, वंचित आणि उपेक्षित व्यक्तींना आवाज व चेहरा देण्याच्या प्रयत्नांचा गौरव झाला आहे,” असे कांबळे यांनी सांगितले.
समाजाने लेखक म्हणून आपला स्वीकार केला, त्यातून मिळालेली ऊर्जा आणि हा पुरस्कार पुढील लेखनासाठी प्रेरणादायी ठरेल. डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांचे कार्य आणि त्यांचा व्यापक वारसा नव्या पिढीसमोर यावा, यासाठी त्यांच्या कार्यावर चित्रपट निर्माण व्हावा तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करणारा संदर्भग्रंथ प्रकाशित व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मराठी भाषा आणि ग्रंथालये टिकविण्याचे आवाहन
अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी प्रवरानगर हे गुणग्राहकतेचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्याला ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मराठी भाषा जाणीवपूर्वक शिकणे ही एक कला आणि तंत्र आहे. मातृभाषेच्या माध्यमातून संस्कारक्षम, सुसंस्कृत आणि सर्वगुणसंपन्न पिढी घडविता येते.
मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी ग्रंथालये आणि शाळा टिकविणे अत्यंत आवश्यक आहे. वाचनाची संस्कृती मजबूत झाली तरच भाषेचे भवितव्य सुरक्षित राहील. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन मराठी भाषा, ग्रंथालये आणि वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करण्याची गरज आहे, असे आवाहन विश्वास पाटील यांनी केले.
विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव
यंदाच्या पुरस्कारांसाठी निवड समितीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची निवड केली. ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ साहित्यिक उत्तम कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार संहिता राजन, विशेष साहित्य पुरस्कार सुरेंद्र दरेकर, राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार तमाशा कलेतील योगदानाबद्दल मालती इनामदार, नाट्यसेवा पुरस्कार सचिन शिंदे यांना देण्यात आला. समाजप्रबोधन पुरस्कार मराठी अभ्यास परिषद, पुणे या संस्थेला, जिल्हा साहित्य पुरस्कार संगमनेर येथील निवृत्ती जोरी यांना, तर प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार संजय गोर्डे यांना प्रदान करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते ‘लढत’ आणि इतर पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केले.
प्रवरानगरच्या मातीतून सुरू झालेली सहकाराची चळवळ केवळ आर्थिक संस्थांची उभारणी करणारी चळवळ न राहता तिने शिक्षण, रोजगार, ग्रामविकास, साहित्य, कला आणि सामाजिक प्रबोधनाचा व्यापक विचार पुढे नेला आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त दिले जाणारे पुरस्कार ही त्याच समृद्ध परंपरेची जपणूक असून, नव्या पिढीतील साहित्यिक, कलाकार आणि समाजप्रबोधनकारांना प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरत आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेऊन साईचे आशिर्वाद घेतले
नंतर त्या नगर कडे रवाना झाल्या ठिक ठिकाणी कार्यकत्यानी त्याचे उस्फूर्त स्वागत केले नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन पुण्याकडे रवाना झाल्या
Comments
Post a Comment