ध्येयाची नशा साहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे साहित्यातून गाठातात लक्ष

ध्येयाची नशा आणि साहित्याची वाट : ‘चला गाठू या लक्ष्य’
भाष्य।शिवाजी घाडगे 
आजच्या तरुणाईसमोर संधींची कमतरता नाही; कमतरता आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि ध्येयावर विश्वास ठेवण्याची. मोबाईलच्या पडद्यावर क्षणाक्षणाला बदलणारे जग, सोशल मीडियावरील आभासी यश, झटपट प्रसिद्धीची अपेक्षा आणि अपयश सहन करण्याची कमी होत चाललेली मानसिकता यामुळे अनेक युवक संभ्रमित झालेले दिसतात. अशा काळात एखादा पोलीस अधिकारी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातून तरुणाईला ध्येयाची दिशा देण्यासाठी पुस्तक लिहितो, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे.
श्रीरामपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे चेतन लोखंडे यांनी लिहिलेले ‘चला गाठू या लक्ष्य’ हे पुस्तक याच दृष्टीने महत्त्वाचे ठरते. पोलीस दलातील कर्तव्य, कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आणि सततचे काम यामधून वेळ काढून साहित्याची वाट धरताना लोखंडे यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांना सामाजिक उपयोगाची दिशा दिली आहे.
एकीकडे समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी जनजागृती केली जात असताना दुसरीकडे तरुणाईने ज्ञानाची, साहित्याची आणि ध्येयाची नशा करावी, असा संदेश एखादा पोलीस अधिकारी देतो, ही विसंगती नसून काळाची गरज आहे. शरीर आणि मनाला पोखरणाऱ्या व्यसनांपासून दूर राहून विचार, वाचन आणि ध्येयाच्या सकारात्मक व्यसनाकडे युवकांनी वळावे, हा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचण्याची गरज आहे.
अपयश म्हणजे शेवट नव्हे
चेतन लोखंडे यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिले तर त्यांच्या यशामागे सरळ आणि सुखकर वाट नव्हती. ग्रामीण वातावरणातून शिक्षण घेताना आलेल्या अडचणी, आर्थिक परिस्थितीची आव्हाने आणि विज्ञान शाखेतील शिक्षणाच्या प्रवासात आलेला अडथळा—या प्रत्येक प्रसंगाने त्यांच्या आयुष्याची परीक्षा घेतली.
परंतु महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या अडचणींना आपल्या जीवनाचा शेवट मानले नाही. अनेकदा अपयश आले की आपण नशिबाला दोष देतो. परिस्थिती प्रतिकूल असल्याचे सांगून प्रयत्न थांबवतो. काही वेळा तर एखादे अपयश संपूर्ण आयुष्याचे अपयश असल्यासारखे आपण स्वीकारतो. लोखंडे यांचा जीवनप्रवास मात्र याच्या अगदी उलट उदाहरण देतो.
विज्ञान शाखेतील अडचणीनंतर त्यांनी बारावी कला शाखेत प्रवेश घेतला. पुढे पदवी आणि मराठी विषयातून एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवली. या प्रवासात एक महत्त्वाचा धडा आहे—दिशा बदलणे म्हणजे ध्येय सोडणे नव्हे.
ध्येय कायम ठेवून मार्ग बदलण्याची तयारी असली पाहिजे. आयुष्यात एखादा दरवाजा बंद झाला म्हणून संपूर्ण इमारतच बंद झाली असे नसते. दुसरा दरवाजा शोधण्याची जिद्द असावी लागते.
आर्थिक अडचणी आणि ज्ञानाची भूक
‘चला गाठू या लक्ष्य’ या पुस्तकामागील एक प्रसंग तरुणाईच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. दहावीची परीक्षा झाल्यानंतर एका मोटिव्हेशनल सेमिनारला जाण्याची इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे लोखंडे यांना त्या कार्यक्रमाला जाता आले नाही. हा प्रसंग त्यांच्या मनावर कोरला गेला.
आज अनेक विद्यार्थ्यांना महागडे कोचिंग, मार्गदर्शन शिबिरे, मोटिव्हेशनल कार्यक्रम किंवा विविध अभ्यासक्रम परवडत नाहीत. आर्थिक परिस्थितीमुळे ज्ञानाची दारे बंद होऊ नयेत, हा विचार समाजाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
याच जाणिवेतून लोखंडे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हातात ‘शब्दरूपी प्रेरणास्रोत’ देण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब केवळ साहित्यनिर्मिती म्हणून पाहता कामा नये. ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची ही सामाजिक बांधिलकी आहे.
आजच्या तरुणाईला खरेच काय हवे?
आज युवकांकडे माहिती प्रचंड प्रमाणात आहे; पण माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. मोबाईलवर काही सेकंदांत हजारो माहितीचे तुकडे मिळतात; परंतु त्या माहितीचे रूपांतर विचारात आणि विचारांचे रूपांतर कृतीत करण्यासाठी वाचन, चिंतन आणि मार्गदर्शन आवश्यक आहे.
आज अनेक युवकांना यश हवे आहे; मात्र त्यासाठी आवश्यक असलेला संघर्ष नको आहे. प्रसिद्धी हवी आहे; पण त्यासाठी लागणारी वर्षानुवर्षांची मेहनत नको आहे. परिणाम हवा आहे; पण प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याची तयारी कमी आहे.
याच ठिकाणी ‘चला गाठू या लक्ष्य’सारख्या पुस्तकांची भूमिका महत्त्वाची ठरते. ध्येय निश्चित करा, प्रयत्न करा, अडचणींना सामोरे जा आणि अपयश आले तरी पुन्हा उभे राहा, हा साधा वाटणारा संदेश प्रत्यक्षात आजच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
पालक आणि शिक्षकांनीही विचार करण्याची वेळ
युवकांच्या यशात केवळ विद्यार्थ्याचीच भूमिका नसते. पालक, शिक्षक आणि समाज यांचीही तितकीच जबाबदारी आहे. प्रत्येक मुलाने डॉक्टर, अभियंता, अधिकारी किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रातच जावे, अशी अपेक्षा लादण्यापेक्षा त्याच्या क्षमतेनुसार त्याला ध्येय निश्चित करण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे.
अपयश आले की मुलाला दोष देण्याऐवजी त्याच्या अपयशाचे कारण समजून घेणे आवश्यक आहे. एका परीक्षेत कमी गुण मिळणे म्हणजे आयुष्य संपणे नव्हे. एका संधीमध्ये अपयश मिळणे म्हणजे भविष्यातील सर्व संधी संपणे नव्हे.
चेतन लोखंडे यांच्या जीवनप्रवासातून याच गोष्टीचा प्रत्यय येतो. शिक्षणाच्या एका टप्प्यावर अडचण आली; पण त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी मार्ग बदलला आणि पुढे आपले ध्येय गाठले.
अधिकारी म्हणून कर्तव्य आणि लेखक म्हणून सामाजिक जबाबदारी
पोलीस अधिकारी म्हणजे केवळ कायदा हातात असलेली व्यक्ती नव्हे. समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारीही पोलीस अधिकाऱ्यांवर असते. गुन्हेगारी रोखणे, कायदा-सुव्यवस्था राखणे याबरोबरच समाजातील तरुण पिढी कोणत्या दिशेने जात आहे, याकडेही संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे.
याच संदर्भात लोखंडे यांचे लेखन महत्त्वाचे वाटते. पोलीस अधिकारी म्हणून ते गुन्हेगारी आणि व्यसनमुक्तीविरुद्ध काम करतात; तर लेखक म्हणून ते युवकांच्या मनात ध्येयाची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न करतात. ही दोन्ही कामे परस्परपूरक आहेत.
कारण गुन्हेगारी आणि व्यसनापासून युवकांना दूर ठेवायचे असेल, तर त्यांच्या हातात केवळ कायद्याचा धाक देऊन चालणार नाही. त्यांच्या हातात ध्येय, शिक्षण, रोजगार, वाचन आणि सकारात्मक विचारांची साधने द्यावी लागतील.
साहित्याची नशा वाढली पाहिजे
आज ‘नशा’ हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर व्यसनाचे चित्र उभे राहते. परंतु त्याच शब्दाला सकारात्मक अर्थ देण्याची वेळ आली आहे. युवकांना वाचनाची नशा लागली पाहिजे. ज्ञानाची नशा लागली पाहिजे. संशोधनाची, कलेची, क्रीडेची आणि समाजसेवेची नशा लागली पाहिजे.
मोबाईलवर तासन्तास वेळ घालविण्यापेक्षा पुस्तक हातात घेण्याची सवय निर्माण झाली, तर त्याचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर निश्चितच होईल. सोशल मीडियावर मिळणाऱ्या क्षणिक प्रसिद्धीपेक्षा एखादे पुस्तक वाचून मिळणारा विचार दीर्घकाळ उपयोगी पडतो.
म्हणूनच ‘चला गाठू या लक्ष्य’ हे शीर्षक केवळ एका पुस्तकाचे नाव न राहता एक सामाजिक आवाहन बनू शकते.
लक्ष्य गाठण्यासाठी पंख स्वतःलाच फुटवावे लागतात
कोणीही आपल्या आयुष्याचे लक्ष्य आपल्या हातात आणून देत नाही. मार्गदर्शन मिळू शकते, संधी मिळू शकते, मदत मिळू शकते; पण चालावे स्वतःलाच लागते. पडल्यावर उठावे स्वतःलाच लागते आणि अंतिम लक्ष्य गाठण्यासाठी शेवटपर्यंत धावावेही स्वतःलाच लागते.
परिस्थिती प्रतिकूल असेल तर संघर्ष अधिक करावा लागतो. आर्थिक अडचणी असतील तर नियोजन अधिक चांगले करावे लागते. अपयश आले तर आत्मपरीक्षण करावे लागते. पण कोणत्याही परिस्थितीत ‘मला हे शक्य नाही’ हा विचार मनात घर करू देता कामा नये.
चेतन लोखंडे यांच्या जीवनप्रवासाचा गाभा हाच आहे. परिस्थितीने त्यांची परीक्षा घेतली; त्यांनी परिस्थितीला उत्तर दिले. अडचणी आल्या; त्यांनी मार्ग शोधला. अपयश आले; त्यांनी नव्याने सुरुवात केली. आणि अखेर ध्येय गाठले.
आजच्या तरुणाईला याच मानसिकतेची गरज आहे.
‘चला गाठू या लक्ष्य’ ही केवळ एका अधिकाऱ्याच्या जीवनप्रवासाची कहाणी नाही; ती संघर्ष करणाऱ्या प्रत्येक युवकाला दिलेली सकारात्मक हाक आहे. स्वप्न पाहा, त्याला ध्येय बनवा, मेहनतीला साथीदार करा, अपयशाला शिक्षक माना आणि लक्ष्य गाठेपर्यंत थांबू नका.
समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी रॅली आवश्यक आहेत; मात्र त्यासोबत समाजाला ध्येयमुक्त नव्हे, तर ध्येयवादी करण्याची चळवळही आवश्यक आहे. हातातील व्यसन काढून घेऊन त्या हातात पुस्तक दिले, तरच परिवर्तनाचा खरा अर्थ साध्य होईल.
आणि म्हणूनच आजच्या तरुणाईला एकच साद—नशा करायचीच असेल तर ज्ञानाची करा; धुंदी चढवायचीच असेल तर ध्येयाची चढवा; आणि आयुष्य घडवायचे असेल तर वाचनाची वाट धरा. चला, गाठू या लक्ष्य!

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन