शनिदेवता विश्वाची न्याय देवता जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल
शनिदेव ही विश्वाची न्यायदेवता : अनुराधा पौडवाल
घाडगे न्यूज। प्रतिनिधी
प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, आपुलकी, ऋणानुबंध आणि भावनिक नात्यांची जपणूक करणारा सण आहे. याच भावनेतून अनुराधा पौडवाल दरवर्षी शनिशिंगणापूरला येतात. यावेळी त्यांनी शनिदेवाला तसेच आपल्या जीवनात मोलाचे स्थान असलेल्या स्व. बाबुराव बानकर यांना राखी अर्पण करून आपल्या भावनिक नात्याला उजाळा दिला.
शनिशिंगणापूर येथे आगमन झाल्यानंतर अनुराधा पौडवाल यांनी उदासी महाराज मठात पुरोहितांच्या हस्ते शनिदेवाला तैलाभिषेक केला. त्यानंतर शनी चौथऱ्याखालून देवाचे औक्षण करून त्यांनी शनिदेवाला राखी अर्पण केली. तसेच पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळीही शनिदेवाला अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत अॅड. आश्लेषा गोवारीकर उपस्थित होत्या.
अनुराधा पौडवाल यांचे शनिदेवाशी असलेले नाते केवळ श्रद्धेपुरते मर्यादित नसून, त्यांच्या कलाप्रवासाशीही ते जोडलेले आहे. सन १९९२ मध्ये त्यांनी शनिदेवाची भजने असलेली मराठी ध्वनिफीत प्रसिद्ध केली होती. त्यानंतर सन १९९५ मध्ये शनिदेवाच्या लीलांवर आधारित ‘सूर्यपुत्र शनिदेव’ हा चित्रपट त्यांनी साकारला. शनिदेवाच्या भक्तीचा आणि त्यांच्या महिमेचा प्रसार करण्यामध्ये या कलाकृतींचे योगदान राहिले आहे. शनिशिंगणापूर हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या तीर्थक्षेत्राची महतीही त्यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर पोहोचली.
दर्शनानंतर जनसंपर्क कार्यालयात अनुराधा पौडवाल यांचा शनिशिंगणापूर देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. शनिशिंगणापूरचे पोलीस पाटील अॅड. सयाराम बानकर आणि कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण वाघ यांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
यावेळी बोलताना अनुराधा पौडवाल यांनी शनिदेवाच्या न्यायव्यवस्थेबाबत आपली श्रद्धा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “शनिदेव हे विश्वाचे न्यायदेवता आहेत. माणूस जशी कर्मे करतो, त्यानुसार त्याला फळ मिळते. चांगले कर्म करणाऱ्यांना शनिदेव चांगले फळ देतात, तर वाईट कर्म करणाऱ्यांना त्यांच्या कर्मानुसार शिक्षा मिळते. त्यामुळे प्रत्येकाने प्रामाणिकपणे आणि चांगल्या भावनेने कर्म केले पाहिजे.”
आपली मनोकामना पूर्ण झाल्यामुळे आपण दरवर्षी शनिदेवाच्या दर्शनासाठी आणि स्व. बाबुराव बानकर यांना राखी बांधण्यासाठी शनिशिंगणापूरला येत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्व. बाबुराव बानकर यांच्याविषयी बोलताना त्या भावुक झाल्या. “स्व. बानकर भाऊ माझ्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. जीवनाच्या प्रवासात त्यांचे मला मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी मला नेहमी बहिणीप्रमाणे प्रेम आणि आधार दिला. त्यामुळे त्यांच्याशी निर्माण झालेले हे भावनिक नाते आजही माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने दरवर्षी शनिशिंगणापूरला येण्यामागील भावना स्पष्ट करताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “शनिशिंगणापूर हे माझे माहेर आहे. शनिदेवाने आणि स्व. बाबुराव बानकर यांनी मला लेक मानले आहे. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त मला येथे माहेरची साडी भेट दिली जाते. माहेरच्या या प्रेमामुळे आणि आपुलकीमुळे शनिशिंगणापूरला येणे हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा आणि भावनिक क्षण असतो.”
त्यांच्या या विधानातून शनिशिंगणापूर आणि येथील नागरिकांशी निर्माण झालेले आत्मीयतेचे नाते अधोरेखित झाले. श्रद्धा, कला आणि माणुसकीच्या नात्यांचा सुंदर संगम त्यांच्या या भेटीतून पाहायला मिळाला.
शनिशिंगणापूर हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शनिदेवाच्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर भाविक येथे येत असतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनुराधा पौडवाल यांनी येथे येऊन केलेले दर्शन आणि शनिदेवाला अर्पण केलेली राखी यामुळे त्यांच्या भक्तीभावाची प्रचिती आली. त्याचबरोबर स्व. बाबुराव बानकर यांच्या स्मृती जपत त्यांनी राखी अर्पण केल्याने या भेटीला वेगळे भावनिक महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी भाऊसाहेब बानकर, नामदेव वरुडे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक किशोर मगर, धर्मेंद्र काकडे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment