पाणी व माती वाचवा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया

नैसर्गिक घटकांचे संवर्धन ही काळाची गरज
— जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
घाडगे न्यूज। प्रतिनिधी
माती आणि पाणी ही आपली अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून, त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी जलसुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी माती व पाणी संवर्धनाची लोकचळवळ उभी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माती व पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात ते बोलत होते.
यावेळी महापौर श्रीमती ज्योती गाडे, नगरसेवक ऋग्वेध गंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, उपवनसंरक्षक सालविठ्ठल, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी मुळीक, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा क्रीडा अधिकारी खुरांगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती गायकवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी चित्रकला, निबंध आणि वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, “उद्याची पिढी सुरक्षित ठेवायची असेल, तर आजच आपण पाण्याची बचत केली पाहिजे. माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया,” असे आवाहन त्यांनी केले.
‘वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जलसंधारण, पाणी बचत, मृदसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सहभागी नागरिकांनी माती व पाणी संवर्धनाचे संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृती केली.
पाण्याचा अपव्यय टाळणे, पावसाचे पाणी साठवणे, वृक्षलागवड करणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि मातीची धूप रोखणे याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘माती वाचवा, पाणी वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन