राहुरी विधानसभा पोटनिवडणूक साठी 23 ला मतदान : प्रशासन सज्ज

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्ण
घाडगे न्यूज। प्रतिनिधी 
राहुरी : राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदारांना सुरक्षित व निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतील एक महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण बदल म्हणजे मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व अन्य साहित्य घेण्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज नसून, त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच थेट साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
वेळ व श्रमाची बचत व्हावी यासाठी सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी थेट त्यांच्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएम मशीनसह सर्व आवश्यक मतदान साहित्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत थेट मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य संबंधित केंद्रावरूनच क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येणार आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ३६ पोलीस अधिकारी, ७०८ पोलीस कर्मचारी आणि ३९१ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची एक तुकडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक प्लाटून सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेवर पारदर्शकतेसाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
मतदार ओळखपत्र नसलेल्या नागरिकांनाही मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने १२ पर्यायी कागदपत्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे छायाचित्रयुक्त पासबुक आदींचा समावेश असून, यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे.
मतदारसंघात १ लाख ७२ हजार २३१ पुरुष, १ लाख ६१ हजार ३१२ महिला आणि २ इतर मतदार असून, सर्वांनी २३ एप्रिल रोजी लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रत्येक नागरिकाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती टाळावी आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व पात्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी केले आहे.
दरम्यान, या पोटनिवडणुकीत सात उमेदवार आपले नशीब आजमावत असून त्यामध्ये भाजपचे अक्षय कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके तसेच अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, अर्थव म्हसे, महेश हापसे यांचा समावेश आहे. एका उमेदवाराने माघार घेतली असली तरी त्यांचे नाव मतदान यंत्रावर राहणार आहे.
या पोटनिवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर