राहुरीत 34221 मतदार वगळले
राहुरी -
२२३ राहुरी विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मतदार पडताळणीचे काम पूर्ण झाले असून, सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या पडताळणीत तब्बल ३४ हजार २२१ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येत लक्षणीय घट झाली आहे.
एसआयआरपूर्वी २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघात ३ लाख २९ हजार ८९३ मतदार नोंदणीकृत होते. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत २ लाख ९५ हजार ६७२ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पडताळणीनंतर एकूण ३४ हजार २२१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये विविध कारणांचा समावेश आहे. त्यामध्ये १३ हजार ९२८ मयत मतदार, २ हजार ९२८ अनुपस्थित मतदार, ११ हजार ६८५ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, ५ हजार ६११ दुबार नोंद असलेले मतदार आणि अन्य कारणांमुळे ६९ मतदारांचा समावेश आहे. या पडताळणीमुळे मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नागरिकांना यादी तपासण्याचे आवाहन
प्रारूप मतदार यादी नागरिकांच्या पाहणीसाठी तहसीलदार कार्यालय, राहुरी, पाथर्डी व अहिल्यानगर तसेच संबंधित सर्व मतदान केंद्रांवर बीएलओंकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विशेषतः ज्या पात्र मतदारांची नावे पडताळणीदरम्यान चुकीने वगळली गेली असतील, त्यांनी निर्धारित मुदतीत आवश्यक अर्ज दाखल करून आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नवीन मतदारांसाठीही संधी
१ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक असून, या दिवशी १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध आहे. त्यासाठी नमुना क्रमांक ६ भरावा लागणार आहे. मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७, तर नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे.
नवीन मतदारांनी तसेच यादीत दुरुस्ती आवश्यक असलेल्या नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२६पर्यंत संबंधित अर्ज दाखल करावेत, असे प्रशासनाने कळविले आहे.
दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता नागरिकांना त्यावर दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून, प्राप्त अर्जांची तपासणी करून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. प्राप्त दावे व हरकतींचे निराकरण २९ ऑक्टोबर २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदार सहायता कक्षाची स्थापना
मतदार यादीबाबत नागरिकांना कोणतीही अडचण, शंका किंवा अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन आवश्यक असल्यास त्यासाठी निवडणूक शाखेत मतदार सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी या कक्षाचा लाभ घेऊन आपले नाव, पत्ता, मतदार क्रमांक तसेच इतर तपशीलांची पडताळणी करून घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
प्रारूप मतदार यादीतून पात्र मतदाराचे नाव चुकून वगळले गेले असल्यास संबंधित मतदाराने विलंब न करता नमुना क्रमांक ६ भरून नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. मतदार यादीतील आपले नाव तपासण्याबरोबरच कुटुंबातील अन्य सदस्यांची नावेही तपासावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंतिम यादीपूर्वी संधीचा लाभ घ्या
मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत राहणे आणि चुकीच्या नोंदी दुरुस्त होणे आवश्यक आहे. एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याने नागरिकांनी प्रारूप यादी काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावरही नागरिकांना आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याची पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला किंवा शेवटच्या क्षणी होणाऱ्या धावपळीला वाव न देता नागरिकांनी मुदतीपूर्वी आपले दावे, हरकती किंवा आवश्यक अर्ज दाखल करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), अहिल्यानगर अनुपसिंह यादव यांनी केले आहे.
Comments
Post a Comment