पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरीत अडीच वर्ष श्रीगोंद्यात अडीच महिने
विशेष।शिवाजी घाडगे
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांतच श्रीगोंद्यातून जावे लागल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. नेमके असे काय घडले की, ठेंगे यांची पुण्याला बदली झाली? की त्यांनीच ती करून घेतली? या प्रश्नाचे उत्तर सध्या नागरिक शोधत आहेत.
विशेष म्हणजे, ज्या राहुरी पोलीस ठाण्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना तब्बल अडीच वर्षे सांभाळले, त्याच ठेंगे यांना श्रीगोंद्यात मात्र अडीच महिनेही पूर्ण करता आले नाहीत, ही बाब पोलीस वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.
ठेंगे यांच्या राहुरीतील कार्यकाळाची आणि श्रीगोंद्यातील अल्प कार्यकाळाची तुलना केली जात असताना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राहुरीत त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार ‘पाण्यात मिसळलेल्या रंगाप्रमाणे रंग घेण्याची’ भूमिका स्वीकारत कारभार केला, अशी चर्चा त्या काळात होती. मात्र श्रीगोंद्यात परिस्थिती वेगळी ठरल्याचे चित्र दिसून आले.
राहुरी हे पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि संवेदनशील पोलीस ठाणे मानले जाते. वाळू तस्करी, अवैध धंदे, गुटखा विक्री यांसह विविध प्रश्नांवर पोलिसांना सातत्याने कारवाई करावी लागते. गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात तर सत्ताधारी आमदारांनीही पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाचे कान टोचले होते. त्यामुळे राहुरीचा कारभारही सोपा नव्हता.
मात्र श्रीगोंद्यात पदभार स्वीकारण्यापूर्वीच ठेंगे यांना एका अनुभवी आणि सेवानिवृत्त एलसीबी पोलिस पाटोळे यांनी निरोपाच्या कार्यक्रमात “साहेब, श्रीगोंद्यात जपून काम करा,” असा अनुभवातून आलेला सल्ला दिला होता. त्या वेळी या सल्ल्याचे गांभीर्य कदाचित जाणवले नसेल; परंतु पुढील घटनाक्रमाने हा सल्ला किती महत्त्वाचा होता, याची चर्चा आता रंगू लागली आहे.
ठेंगे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया झाल्या. तीन पोलीस कर्मचारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेल्याने पोलीस ठाण्याच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एका मागोमाग घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढल्याचे बोलले गेले.
इतकेच नव्हे तर स्थानिक नागरिकांनी जाहीर सभा घेऊन पोलिसांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. नागरिकांच्या तक्रारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू लागल्या. त्यामुळे श्रीगोंद्यातील वातावरण अधिकच तापले.
दरम्यान, ठेंगे यांच्या बदलीची चर्चा सुरू झाल्यानंतर “ही बदली प्रशासकीय कारणास्तव झाली की वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर करून घेण्यात आली?” हा प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पुणे येथे बदली झाल्याची माहिती समोर आल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
पोलीस अधिकाऱ्याची बदली ही प्रशासनातील नियमित प्रक्रिया असू शकते. मात्र एखादा अधिकारी एखाद्या ठिकाणी अडीच वर्षे काम करतो आणि दुसऱ्या ठिकाणी अवघ्या अडीच महिन्यांतच बदली होते, तेव्हा त्या बदलामागची कारणे जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांना असणे स्वाभाविक आहे.
श्रीगोंद्यातील नागरिकांच्या तक्रारी, पोलीस कर्मचाऱ्यांवरील लाचलुचपत कारवाया, जाहीर सभांमधून व्यक्त झालेली नाराजी आणि त्यानंतर झालेली बदली—या घटनाक्रमाची एकत्रित सांगड घातली तर अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.
राहुरीने संजय ठेंगे यांना अडीच वर्षे सांभाळले; मग श्रीगोंद्याने अडीच महिन्यांतच त्यांना निरोप का दिला?
हा प्रश्न केवळ एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीपुरता मर्यादित नाही. या बदलीमागे नेमके प्रशासकीय कारण काय होते, याचे अधिकृत स्पष्टीकरण पोलीस प्रशासनाकडून समोर येणे आवश्यक आहे. कारण चर्चांना पूर्णविराम देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे पारदर्शक खुलासा.
आता पुण्याच्या नव्या नियुक्तीस्थळी संजय ठेंगे यांची पुढील कारकीर्द कशी राहते, याकडेही पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र श्रीगोंद्यातील अडीच महिन्यांचा कार्यकाळ आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न अजूनही नागरिकांच्या चर्चेत आहेत.
राहुरी अडीच वर्षे... श्रीगोंदा अडीच महिने!
या दोन आकड्यांमधील अंतरच सध्या श्रीगोंद्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय बनले आहे.
Comments
Post a Comment