गणेशोत्सव आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा-जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका

गणेशोत्सव आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा ; जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका 
घाडगे न्यूज| प्रतिनिधी
गणेशोत्सव हा आनंद, उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा सर्वांनी मनमुराद आनंद घ्यावा; मात्र हा आनंद इतरांना त्रासदायक ठरणार नाही, याचीही काळजी घ्यावी. गणेशोत्सवात डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. तसेच ‘नशामुक्त अहिल्यानगर’ या अभियानाचा प्रचार व प्रसार करून तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राहुरी येथे गणेश मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, ध्वनिप्रदूषण, विसर्जन मिरवणूक आणि सामाजिक सलोखा यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक मुम्मका बोलत होते.
उत्सव आनंदाचा; मात्र सामाजिक भानही हवे
मुम्मका म्हणाले की, गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या भावनेशी जोडलेला उत्सव आहे. या उत्सवात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे. मात्र उत्सव साजरा करताना समाजातील इतर घटकांनाही त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. गणेश मंडळांनी केवळ मोठ्या आवाजातील संगीत आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांपुरता उत्सव मर्यादित न ठेवता त्यातून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करावा.
गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती जनजागृती, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू कुटुंबांना मदत आदी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. गुणवंत आणि गरजू विद्यार्थिनींना सायकली देण्यासारखे उपक्रम राबवून शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे. समाजातील सर्वसामान्य आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे हीच गणेशोत्सवाची खरी सामाजिक भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘नशामुक्त अहिल्यानगर’ अभियानात मंडळांनी सहभागी व्हावे
जिल्ह्यात पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून ‘नशामुक्त अहिल्यानगर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान होत असून तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
गणेश मंडपांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीपर फलक लावावेत, व्याख्याने आयोजित करावीत आणि युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करावे. गणेशोत्सव हा समाजजागृतीसाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो, असेही मुम्मका यांनी सांगितले.
अहिल्यानगरचा जातीय सलोखा कायम ठेवा
अहिल्यानगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या जागृत जिल्हा आहे. विविध समाज, धर्म आणि जातीचे नागरिक येथे वर्षानुवर्षे एकोप्याने राहत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी नोकरीच्या निमित्ताने जिल्ह्यात येतात आणि बदलीनंतर अन्यत्र जातात; मात्र येथील सामाजिक व जातीय सलोखा कायम ठेवण्याची जबाबदारी स्थानिक नागरिकांची आणि प्रशासनाची आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही अफवेला बळी न पडता शांतता आणि सलोखा राखावा. सोशल मीडियावरून चुकीचे, आक्षेपार्ह किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करू नयेत. एखादी संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास स्वतः कायदा हातात न घेता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
‘डीजे’ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर
गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेश मंडळांनी डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन द्यावे. ढोल-ताशा, लेझीम आणि अन्य पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सवाचा आनंद घेता येतो. पारंपरिक वाद्यांमुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपराही जपली जाते, असे मुम्मका यांनी सांगितले.
कायदा मदतीसाठी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
“कायदा हा नागरिकांना त्रास देण्यासाठी नसून त्यांच्या मदतीसाठी आहे. मात्र कोणी कायद्याचे उल्लंघन केले तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक मुम्मका यांनी दिला. मागे काय झाले हे मला सांगु नका व पुढच्या गणेश उत्सव चा आनंद घ्यायचा असेल तर या वेळी निट वागा राहून राहून डीजे वर येवू नका आपल्याला काही अडचण असल्यास थेट मला संपर्क करा 
गणेशोत्सव काळात ध्वनीमर्यादा, वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुव्यवस्था आणि मिरवणुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांना पोलिस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक गणेश मंडळासाठी पोलीस कर्मचारी
गणेशोत्सव काळात मंडळांना पोलिस प्रशासनाशी समन्वय साधताना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रत्येक गणेश मंडळासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. गणेशमूर्ती स्थापना झाल्यापासून विसर्जनापर्यंत संबंधित पोलीस कर्मचारी मंडळाच्या संपर्कात राहून आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करणार आहे.
मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही संबंधित पोलिस कर्मचाऱ्याशी समन्वय ठेवून उत्सवाचे नियोजन करावे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंडळांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन करण्यात आले.
रस्ते अडवू नका; विसर्जन मिरवणुकीत विशेष खबरदारी
गणेशोत्सव काळात मंडप, स्वागत कमानी किंवा अन्य कारणांसाठी रस्ते पूर्णपणे अडविले जाणार नाहीत, याची गणेश मंडळांनी काळजी घ्यावी. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांशी समन्वय साधावा.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीत सहभागी नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण, महिलांची व बालकांची सुरक्षितता तसेच कायदा-सुव्यवस्था यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी
बैठकीत विविध लोकप्रतिनिधी आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या. नगरसेवक प्रतीक तनपुरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सोन्याबापू जगधने, देवेंद्र लांबे आणि आप्पासाहेब ढूस यांनी चर्चेत सहभाग घेतला.
आप्पासाहेब ढूस यांनी देवळाली प्रवरा तसेच राहुरी तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली. वाढती लोकसंख्या आणि विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते अरुण साळवे यांनी गणेशोत्सवाच्या काळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच विविध गुन्ह्यांतील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी केली. उत्सव शांततेत पार पडण्यासाठी संभाव्य उपद्रवी घटकांवर पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रशासन-पोलिस-मंडळांचा समन्वय महत्त्वाचा
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, नगरपरिषद, महसूल विभाग आणि गणेश मंडळांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस तहसीलदार डॉ. अमित पाटील, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, मुख्याधिकारी विद्या पाटील, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सोन्याबापू जगधने, प्रतीक तनपुरे, राजेंद्र उंडे, नंदकुमार तनपुरे, आर. आर. तनपुरे, अक्षय तनपुरे, प्रदीप भुजाडी, बबन गुलदगड आदी उपस्थित होते.
बैठकीला आझाद मित्र मंडळ, व्यंकटेश मित्र मंडळ, मळगंगा मंडळ, गजानन मंडळ, श्री दत्त मंडळ, नाथ प्रतिष्ठान, महालक्ष्मी मंडळ, शिवाजी चौक मित्र मंडळ यांसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक संदेश देणारा गणेशोत्सव ठरावा
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरावे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त झाली. डीजेचा दणदणाट टाळून पारंपरिक वाद्यांचा निनाद, व्यसनमुक्तीचा संदेश, गरजूंची मदत, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि सामाजिक सलोखा या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा संदेश पोलिस प्रशासनाने दिला.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन