महिला मंडल अधिकाऱ्यांवर लाचेचा गुन्हा
नगर| प्रतिनिधी
बुऱ्हानगर येथील प्लॉटची सातबारा उताऱ्यावरील नोंद संगणकीकृत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कापुरवाडी मंडळ अधिकारी संगिता नारायण पुंड (वय ३७) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुंड यांना मंगळवारी ८ सप्टेंबर अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय तक्रारदार चालक असून, त्यांनी आपल्या मित्रासोबत दस्त क्र. अ.नं. १/२९१६/२०१३ अन्वये मौजे बुऱ्हानगर येथील गट क्रमांक ६ मधील प्लॉट क्रमांक ४९ मधील ४७५ चौ.मी. क्षेत्रापैकी २१०.९० चौ.मी. क्षेत्र खरेदी केले होते. या खरेदीची नोंद फेरफार क्रमांक ६८०२ अन्वये सातबारा उताऱ्यावर झाली होती. मात्र संगणकीकृत सातबारा तयार करताना ही नोंद कार्यान्वित झाली नव्हती.
त्यामुळे संबंधित प्लॉटचा ऑनलाइन सातबारा उतारा मिळण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या मित्राने ८ डिसेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर तहसीलदारांकडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी कापुरवाडी मंडळ अधिकारी संगिता पुंड यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
तक्रारदाराने २४ जुलै २०२६ रोजी चौकशीच्या अनुषंगाने कापुरवाडी येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पुंड यांची भेट घेतली. त्यावेळी प्लॉटच्या २१०.९० चौ.मी. क्षेत्राची नोंद संगणकीकृत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यावेळी तक्रारदाराने त्यांना एक हजार रुपये दिले. त्यानंतर उर्वरित चार हजार रुपयांची मागणी होत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
या तक्रारीची २७ जुलै रोजी कापुरवाडी मंडळ अधिकारी कार्यालयात पडताळणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान पुंड यांनी यापूर्वी एक हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करत उर्वरित चार हजार रुपयांची मागणी केल्याचे आणि ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीने म्हटले आहे.
दरम्यान, तक्रारदाराने तहसील कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला किती पैसे द्यायचे, अशी विचारणा केली असता, संबंधित अधिकाऱ्याशी बोलून त्यांची भेट घालून देण्याचे पुंड यांनी सांगितल्याचेही पडताळणी कारवाईत स्पष्ट झाल्याचे एसीबीने नमूद केले आहे.
या प्रकरणात प्रत्यक्ष सापळा कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र लाच मागणीच्या पडताळणीच्या आधारे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचे नेतृत्व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे यांनी केले. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी काम पाहिले. पथकात पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक आणि सुपेकर यांचा समावेश होता. कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.
लाच मागितल्यास एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन
भ्रष्टाचारासंबंधी माहिती किंवा कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अहिल्यानगर एसीबी कार्यालयाचा टोल फ्री क्रमांक १०६४ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२४२३६७७ आहे. तसेच व्हॉट्सॲप क्रमांक ९९३०९९७७०० / ९१६८६४१०६४ वर संपर्क साधता येणार आहे.
Comments
Post a Comment