तंत्रज्ञानच्या आरशात आरशात दिसले बालपन
तंत्रज्ञानाच्या आरशात दिसलेले आपलेच बालपण!
भाष्य।शिवाजी घाडगे
जशी एखादी चिमणी आपल्या गाडीच्या आरशात बसून आपलेच रूप न्याहाळते, तसेच गेल्या काही दिवसांत अनेकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेल्या आपल्या जुन्या व नव्या छायाचित्रांकडे पुन्हा पुन्हा पाहिले आणि त्या आठवणींमध्ये अक्षरशः रमून गेले. कुणी आपल्या बालपणातील रूप पाहिले, कुणी तरुणपणातील चेहरा पाहिला, तर कुणी आई-वडिलांसोबतचे जुने दिवस नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा डोळ्यांसमोर उभे केले. या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—तंत्रज्ञान कितीही आधुनिक झाले, तरी माणसाच्या आठवणी मात्र कायम जुन्याच असतात.
आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपले छायाचित्र जणू काळाच्या पडद्याआड नेऊन पुन्हा आपल्यासमोर आणले आहे. चार-पाच दशकांपूर्वी आपण कसे दिसत होतो, आपले बालपण कसे होते, तरुणपणीचा चेहरा कसा होता, आपल्या आजूबाजूला कोणती माणसे होती, हे पाहण्याची एक वेगळीच संधी या तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली. विशेषतः ज्यांचे वय आता ४६ वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांनी या छायाचित्रांकडे पाहताना केवळ स्वतःचा चेहरा पाहिला नसेल; तर त्यामागे दडलेला अर्धशतकाच्या आसपासचा जीवनप्रवासही अनुभवला असेल.
त्या एका छायाचित्राने कितीतरी प्रश्न मनात उभे केले असतील. त्या काळापासून आजपर्यंत आपण किती बदललो? आपल्या जीवनात काय सकारात्मक घडले? कोणती स्वप्ने पूर्ण झाली? कोणती स्वप्ने अपुरी राहिली? कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले? कोणत्या संघर्षांनी आपल्याला घडवले? कोणत्या व्यक्तींनी आपल्या आयुष्याला दिशा दिली? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—आपल्या आई-वडिलांनी आपल्याला त्या काळात किती जपले, सांभाळले आणि घडवले?
जुन्या छायाचित्राकडे पाहताना कदाचित अनेकांच्या डोळ्यांसमोर आईचा पदर आला असेल, वडिलांचा कष्टाळू चेहरा आठवला असेल. घरातील साधेपणा, अंगणातील खेळ, शाळेची पाटी, मित्रांची संगत, गावातील रस्ते, सण-उत्सव, नातेवाईकांचे प्रेम आणि त्या काळातील जगण्याची धडपड—या सगळ्या आठवणी एका छायाचित्रामुळे पुन्हा जिवंत झाल्या असतील.
आज सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अनेकांनी हे फोटो आपल्या मित्रपरिवाराच्या आणि नातेवाईकांच्या दृष्टीस आणले. कुणी कौतुक केले, कुणी ‘वा!’, ‘किती बदललात!’ अशा प्रतिक्रिया दिल्या, तर कुणी जुन्या आठवणींना उजाळा दिला. काहींनी आपले बालपणीचे रूप पाहून हसले, काही भावुक झाले आणि काहींनी तर त्या एका छायाचित्राच्या निमित्ताने संपूर्ण दिवस आठवणींमध्ये घालवला.
खरे तर ही केवळ छायाचित्रांची गंमत नव्हती. ही स्वतःकडे पुन्हा एकदा पाहण्याची संधी होती.
धावपळीच्या वर्तमान जीवनात आपण स्वतःसाठी किती वेळ देतो? मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया, व्यवसाय, नोकरी, राजकारण, समाजकारण आणि असंख्य जबाबदाऱ्यांच्या गर्दीत आपण आपलेच बालपण कुठेतरी मागे सोडून आलो आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाने काही क्षणांसाठी का होईना, आपल्याला त्या हरवलेल्या काळात नेले. म्हणूनच या छायाचित्रांना एवढा प्रतिसाद मिळाला असावा.
मात्र या सगळ्या आनंदाच्या आणि आठवणींच्या वातावरणामागे तंत्रज्ञानाचे दुसरे एक गंभीर रूपही आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे जात आहे की, माणूस स्वतःच निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षमतेसमोर आश्चर्यचकित झाला आहे. काही मंडळी तर भविष्यात हे तंत्रज्ञान मानवाच्या अनेक क्षेत्रांतील भूमिका कमी करेल, अनेक पारंपरिक कामे संपुष्टात आणेल आणि कदाचित एक दिवस मानवाच्या अस्तित्वालाच मोठे आव्हान निर्माण करेल, अशी भीती व्यक्त करीत आहेत.
ही भीती कितपत खरी ठरेल, हे काळच ठरवेल. परंतु एक गोष्ट निश्चित आहे—तंत्रज्ञान हे साधन आहे; ते माणसाचा पर्याय बनू नये. कारण तंत्रज्ञान छायाचित्र तयार करू शकते, आठवणी जागवू शकते, चेहरा बदलू शकते, आवाजाची नक्कल करू शकते; पण आईची माया, वडिलांचे कष्ट, बालपणातील निरागसता, मैत्रीतील जिव्हाळा आणि जगलेल्या आयुष्याची खरी अनुभूती निर्माण करू शकत नाही.
म्हणूनच या तंत्रज्ञानाच्या आरशात स्वतःकडे पाहताना आपण केवळ ‘पूर्वी मी कसा दिसत होतो?’ एवढाच प्रश्न विचारू नये. त्यापेक्षा ‘पूर्वीचा मी आणि आजचा मी यांच्यामध्ये नेमका किती बदल झाला?’ हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे.
चेहरा बदलतो, केस पांढरे होतात, शरीरावर वयाच्या खुणा उमटतात; पण आठवणींच्या कप्प्यातील बालपण मात्र तिथेच राहते. आधुनिक तंत्रज्ञानाने त्या आठवणींची दारे उघडली आहेत. त्या दारातून डोकावताना आपल्याला आपले जुने रूप दिसते; पण त्याचबरोबर आपल्या आयुष्याचा प्रवासही दिसतो.
कदाचित म्हणूनच या तंत्रज्ञानाने तयार केलेल्या जुन्या छायाचित्रांनी इतकी धमाल केली. लोकांनी स्वतःचेच रूप पाहिले, स्वतःवरच हसले, जुन्या मित्रांना आठवले, आई-वडिलांना स्मरले आणि काही क्षणांसाठी का होईना, वर्तमानाच्या धावपळीतून बाहेर पडून आपल्या भूतकाळात फेरफटका मारला.
आठवणींचा हा प्रवास तंत्रज्ञानाने घडवून आणला असला, तरी त्या आठवणींची किंमत तंत्रज्ञानाने नाही, तर आपण जगलेल्या आयुष्याने ठरवली आहे.
शेवटी प्रश्न तंत्रज्ञान माणसाला संपवेल की नाही, हा नाही. खरा प्रश्न असा आहे की, तंत्रज्ञानाच्या अफाट वेगात माणूसपण आपण जपणार आहोत का?
कारण भविष्यात कितीही अत्याधुनिक यंत्रे आली, कितीही कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झाली, तरी आरशात दिसणाऱ्या चेहऱ्यामागची खरी ओळख, डोळ्यांत दडलेल्या आठवणी
Comments
Post a Comment