राहुरीची आमदारकी "दादा" भोवती
@शिवाजी घाडगे
राहुरी विधानसभा मतदारसंघाची संभाव्य पोटनिवडणूक सध्या विविध ‘दादा’ नावांभोवती फिरत असल्याचे चित्र आहे. डाॅ सुजय दादा विखे-पाटील, प्राजक्त दादा तनपुरे, अक्षय दादा कर्डीले , हर्ष दादातनपुरे,
सत्यजित दादा, या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. नेमका कोणता ‘दादा’ आमदार होणार, हे मात्र काळच ठरवेल.
नगरपालिकेच्या निवडणुकीतील गुलाल अजून रस्त्यावरून पुसला गेलेला नसतानाच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. फेब्रुवारी २०२६ नंतर कोणत्याही क्षणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याने कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळणार, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
भाजपकडून अक्षय दादा कर्डीले यांना उमेदवारी दिली जाणार की माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे-पाटील किंवा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांना संधी मिळणार, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्याचा पूर्वीचा इतिहास लक्षात घेता, अक्षय कर्डीले यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. मात्र संघाशी जवळीक असलेला उमेदवार दिल्यास सत्यजित कदम यांचाही विचार होऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी खचून न जाता राहुरी व संगमनेर परिसरावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र त्या वेळी दिवंगत शिवाजी कर्डीले यांनी आपला राजकीय हक्क सोडला नव्हता. प्रचारादरम्यान ‘ही माझी शेवटची निवडणूक’ असे सांगत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विजय मिळवला; मात्र हा विजय अल्पकाळ टिकला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले हे अत्यंत चाणाक्ष नेतृत्व होते. गावचे सरपंच ते राज्य मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली. पराभवाने न खचता पुन्हा तन-मन-धनाने त्यांनी आमदारकी मिळवली. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहिला, यावरून ते किती मोठे व कामाचे नेतृत्व होते, हे सिद्ध झाले. त्यांनी आपली कीर्ती मागे ठेवून गेली असून त्याच वारशावर अक्षय कर्डीले यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेसकडून माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचे नाव आघाडीवर आहे. मंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कालावधीत कोरोना काळ व त्यानंतर झालेले सत्तांतर यामुळे अनेक अडचणी आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची संधी असूनही त्यांनी शरद पवार गटाशी निष्ठा राखली. २५ वर्ष आमदार राहिलेले त्यांचे वडील, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना कधीच मंत्रीपद न मिळाल्यानंतरही कुटुंबाने निष्ठा कायम ठेवली आणि तालुक्यातील राजकीय ताकद टिकवून ठेवली.
ही ‘करो वा मरो’ची निवडणूक ठरण्याची शक्यता असून अभ्यासू व संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना आपली गमावलेली आमदारकी परत मिळवण्यासाठी जोरदार लढत द्यावी लागणार आहे.
दरम्यान, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी राहुरीतून उमेदवारी करावी, अशीही मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, तर चित्र वेगळे असू शकते. तसेच दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढल्या, तर प्राजक्त तनपुरे यांचे बंधू, नूतन नगरसेवक व सहकारी कारखान्याचे संचालक हर्ष दादा तनपुरे हेही उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात.
एकूणच राहुरीची आमदारकी सध्या ‘दादा’भोवती फिरत असून, कोणता ‘दादा’ आमदार करायचा हे राहुरी, पार्थडी व नगर तालुक्यातील सुज्ञ मतदारच ठरवतील.
Comments
Post a Comment