देवळाली प्रवरात कोणाचा झेंडा
घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी, सोशल मीडियावरील प्रचार, बॅनर्स, चौकसभा यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक नियोजित वेळेत झाली असती तर चित्र वेगळे असले असते; मात्र मुदतवाढीनंतर ही लढत अधिकच उत्कंठावर्धक बनली आहे.
सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता तिरंगी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजपा, काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) या प्रमुख पक्षांमध्ये थेट सामना रंगणार आहे.
भाजपाकडून माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, काँग्रेसकडून शहराध्यक्ष व तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, तर शिवसेना (शिंदे) गटाकडून उद्योजक बाबासाहेब मुसमाडे हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय बहुजन वंचित समाज पक्षाचे ॲड. प्रसाद सांगळे यांनीही स्वतंत्र ताकद उभी केली आहे.
या निवडणुकीत कमळ, पंजा, धनुष्यबाण आणि गॅस टाकी या चिन्हांमध्ये लढत पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ, तुतारी किंवा मशाल ही चिन्हे मात्र यावेळी मैदानातून गायब आहेत.
भाजपाचे सत्यजित कदम दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असून नव्या उमेदवारांसह त्यांनी स्वतंत्र टीम उभी केली आहे. माजी सहा नगरसेवक त्यांच्यापासून दूर गेले असले तरी केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची सत्ता असल्याचा मुद्दा प्रचारात ठळकपणे मांडला जात आहे.
शिवसेना (शिंदे) गटाने कमी कालावधीत उमेदवार निश्चित करत आक्रमक प्रचार सुरू केला आहे. बाबासाहेब मुसमाडे यांनी धनुष्यबाण मिळवण्यात यश मिळवत भाजपावर थेट टीका केली आहे. मागील सत्ताकाळात विकास का झाला नाही, असा सवाल उपस्थित करत ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जोरावर पालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसने संयमित भूमिका घेत ‘हम सब एक है’ या घोषणेसह प्रचार सुरू केला आहे. आमदार हेमंत ओगले यांनी प्रचारयंत्रणा सक्रिय करत श्रीरामपूर व देवळाली प्रवरा या दोन्ही पालिकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. मितभाषी आणि अनुभवी उमेदवार म्हणून कृष्णा मुसमाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बहुजन वंचित समाज पक्षाचे ॲड. प्रसाद सांगळे हे प्रकाश आंबेडकर यांच्या विचारधारेसह मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून येणार, याची बेरीज-वजाबाकी सुरू असून डिसेंबरच्या थंडीतही देवळालीतील राजकीय वातावरण तापलेले आहे. निवडणूक पुढे ढकलल्यामुळे सर्वच पक्षांचे नियोजन काही अंशी कोलमडले असले, तरी प्रचारात रंगत आली आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेत कमळ फुलणार, हात बळकट होणार की धनुष्यबाण टोचणार—हे निकालानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत चर्चांना मात्र उधाण येणार, हे नक्की.
Comments
Post a Comment