शहर विकासा साठी सर्वांचे सहकार्य हवे-नगराध्यक्ष सत्यजित कदम
देवळाली प्रवरा ।
देवळाली प्रवरा नगरपालिकेचा नावलौकिक अधिक उंचावण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, असा विश्वास नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यक्त केला. पत्रकार स्नेह-सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुधाकर कराळे होते.
नगराध्यक्ष कदम म्हणाले की, मागील जवळपास चार वर्षांपासून नगरपालिकेवर शासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. यामुळे आरोग्य विभागातील ठेकेदार व कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत आहे. काही भागात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून सार्वजनिक शौचालयांचीही समस्या आहे. तसेच घरकुल योजना व पालिकेचा संथ झालेला विकास पुन्हा जोमाने मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.
वाड्या-वस्त्यांवर बिबट्याचा वावर वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सुमारे ५ हजार मर्क्युरी बल्ब बसवून परिसर प्रकाशमय करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून राज्य महामार्गाच्या कामामुळे पूर्वी चौपदरी असलेला रस्ता आता ३० मीटरवरून १८ मीटरपर्यंत अरुंद झाला आहे. दोन्ही बाजूंना गटारे असल्याने महामार्गावरून दोन वाहनेही नीट चालू शकत नाहीत. या समस्यांबाबत लवकरच बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय अनुदान हे पालिकेच्या कर वसुलीवर अवलंबून असल्याने कर वसुलीवर विशेष लक्ष दिले जाईल. शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर दुसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून भविष्यात पत्रकार भवन उभारण्यात येईल, अशी ग्वाही देत पालिकेच्या वतीने पत्रकारांचा स्नेह-सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार रफिक शेख व शिवाजी घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्षा बेबी बर्डे, कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के, गटनेते दासू पठारे, सर्व नगरसेवक व पालिका कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप गटनेते प्रकाश संसारे यांनी केले.
Comments
Post a Comment