शौचालय दुरुस्ती बाबदचे आंदोलन तूर्त स्थगित-अप्पासाहेब ढुस

 प्रसादनगर येथील शौचालय दुरुस्तीचे लेखी आश्वासन; आंदोलन तूर्त स्थगित
– आप्पासाहेब ढूस
घाडगे न्यूज। 
देवळाली प्रवरा नगरपरिषदेने प्रसादनगर भागातील दोन्ही सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने २६ जानेवारी रोजी होणारे  आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी दिली.
 ढूस म्हणाले की, आंदोलनापूर्वीच नगरपरिषदेने शौचालय दुरुस्तीचा निर्णय घेतल्याबद्दल नगरपरिषद प्रशासनाचे हार्दिक आभार. प्रहार जनशक्ती पक्ष व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली आणि शौचालय दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. 
 प्रसादनगर प्रभात सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय असून तेथे साठलेल्या मैल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आप्पासाहेब ढूस यांनी  नगरपरिषदेला आंदोलनाचा इशारा देत निवेदन सादर केले होते. त्यामध्ये २६ जानेवारी रोजी वाजत-गाजत नगरपरिषद कार्यालयात शौचालयातील घाण टाकण्याचे आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
या निवेदनाच्या अनुषंगाने नगरपरिषदेने  १९ जानेवारी रोजी आप्पासाहेब ढूस यांना लेखी पत्र देत कळविले की, प्रसादनगर येथील शौचालय दुरुस्तीचा अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो सप्टेंबर २०२५ मध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय, मुंबई येथे सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्तावास अद्याप मंजुरी मिळालेली नसून, मंजुरी व निधी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रस्तावास मंजुरी मिळताच तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे २६ जानेवारी रोजीचे आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले.
यावर प्रत्युत्तर देताना ढूस यांनी नगरपरिषदेला उलट टपाली पत्र पाठवून सांगितले की, नगरपरिषदेच्या सूचनेचा आदर आहे; मात्र प्रसादनगर येथील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत गंभीर असून याबाबत वारंवार कळवूनही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे निधी उपलब्ध होईपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपरिषदेने तत्काळ मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून द्यावीत. अशी मागणी केली होती 
दरम्यान, शौचालय दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्यास ‘भिक मांगो आंदोलन’ करून शौचालय दुरुस्त करू, असे सामाजिक माध्यमांवर जाहीर केल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने शौचालय दुरुस्तीच्या निविदा काढून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने २६ जानेवारी रोजी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन