स्वच्छ व सुंदर संत ज्ञानेश्वर शाळा
स्वच्छ व सुंदर शाळा – संत ज्ञानेश्वर विद्यालय
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे साहेब व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वामी विवेकानंद ट्रस्टचे उपाध्यक्ष व प्राचार्य भारत वारुळे यांच्या संकल्पनेतून संत ज्ञानेश्वर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज ‘स्वच्छ व सुंदर शाळा’ स्पर्धेत सहभागी झाले आहे. या उपक्रमामुळे शाळेचा आणि परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून गेला आहे.
पूर्वी साधा वाटणारा शाळेचा परिसर आज “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या भावनेतून लावलेल्या झाडांमुळे हिरवागार, फुलांनी नटलेला आणि प्रसन्न झाला आहे. झाडे कधी वाढली, कधी बहरली हे कळलेही नाही; मात्र आज संपूर्ण परिसर निसर्गरम्य दिसतो.
पूर्वी विद्यार्थी दुपारच्या सुट्टीत जमिनीवर बसून मध्यान्ह भोजन घेत असत. त्यानंतर टाकळीमिया ग्रामपंचायतीचे सरपंच गायकवाड यांनी समोरील मैदानावर खडी टाकून दिली. कडेला वृक्षलागवड करण्यात आली. शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली आणि समोर भव्य क्रीडांगण विकसित करण्यात आले. आजूबाजूची अतिक्रमणे सामंजस्याने दूर करण्यात आली.
हे सर्व परिवर्तन शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील वारे गुरुजींच्या प्राथमिक शाळेला सर्व स्टाफने भेट दिल्यानंतर प्रेरणेतून घडले. तेथे मोठ्या प्रमाणात CSR निधी मिळतो; मात्र येथे दाते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामपंचायत यांच्या सामूहिक सहकार्यामुळे शाळेचे स्वरूप पालटले.
शाळेला संत ज्ञानेश्वरांचे नाव असल्याने त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व सुशोभीकरण करण्यात आले. शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. चित्रप्रेमी दादासाहेब गागरे व विशाल तागड यांनी जलसंवर्धन, वाचनाचे महत्त्व, मराठी महिने, जीवनमूल्ये आदी विषयांवर सुंदर भित्तीचित्रे साकारली. स्वच्छतेमुळे कोपरे-कापरे उजळले आणि वाचन कट्टे तयार झाले.
परिसरातील झाडे, वेली, फुलझाडे व परसबागेची निगा प्रणव शिंदे घेतात. पर्यवेक्षिका दिघे मॅडम वर्गखोल्यांभोवती नियमित फेऱ्या मारतात. नितीन घोलप सरांची शिट्टी शिस्तीची आठवण करून देते. शेळके व सितल लबडे मॅडम सांस्कृतिक कार्यक्रमांत व्यस्त असतात, तर भालसिंग मॅडम यांचा गणित विषयाचा सेमीचा निकाल शंभर टक्के लागला आहेच.
‘चट तासां’मध्ये विद्यार्थी गप्पा न करता कथा, गोष्टी वाचन करतात. शाळेची इमारत, प्रशस्त वर्गखोल्या, मैदान, शिक्षक-विद्यार्थी यांचे जिव्हाळ्याचे नाते आणि दिले जाणारे संस्कार हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांपेक्षा कैक पटीने सरस ठरावा, इंग्रजीत आत्मविश्वासाने बोलावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. याचे कौतुक खुद्द अध्यक्ष अरुण तनपुरे साहेब यांनीही केले आहे.
स्वच्छता हा शाळेचा आरसा मानून त्यावर विशेष भर दिला जातो. वर्गखोल्या, स्वच्छतागृहे व मैदान नेहमी स्वच्छ ठेवले जातात. खेळती हवा, योग्य प्रकाश, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञान भिंतींवर अवतरले आहे.
खेळ, कला व सांस्कृतिक गुणांना प्रोत्साहन दिले जाते. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, निसर्ग अभ्यासासाठी भौगोलिक सहली आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कोर्सेस, सैन्यभरतीसाठी मार्गदर्शन, स्काऊट-गाईड प्रशिक्षण दिले जाते. कठीण परिस्थितीवर मात करून चांगला माणूस कसा घडतो, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाते.
संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ही खरंच एक आदर्श व सुंदर शाळा आहे. येथे शिस्त, ज्ञान आणि सुसंस्कारित युवक घडवले जातात. शिक्षणावर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थांचे योगदान विसरता येणार नाही. विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी उद्योजक केशव शिंदे यांनी दिलेले जलशुद्धीकरण यंत्र महत्त्वाचे ठरले आहे.
या सुंदर शाळेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे.
—@ शिवाजी घाडगे
Comments
Post a Comment