नविन तुती लागवडी साठी अर्ज करा

नवीन तुती लागवडीसाठी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी – संदीप आगवणे
घाडगे न्यूज | प्रतिनिधी
रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत ५ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक व शेतीपूरक रेशीम उद्योग सुरू करून आर्थिक प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले. यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यात तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळू शकतो. रेशीम उद्योगासाठी राज्यात अनुकूल वातावरण असून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उत्पादनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेशीम कोष उत्पादन होत असून अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष उत्पादनाची कामे सुरू आहेत. रेशीम उत्पादनांना दिवसेंदिवस वाढती मागणी असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनामार्फत विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत.
जिल्हा रेशीम कार्यालय, अहिल्यानगरमार्फत तुती लागवड रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय अथवा जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत नोंदणी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्याने सहभागी होता येणार आहे.
योजनेअंतर्गत १ एकर क्षेत्रावरील तुती लागवड व संगोपनासाठी तीन वर्षांत एकूण ८९५ मनुष्यदिवसांची मजुरी देण्यात येते. २०२५-२६ च्या दरानुसार मजुरीपोटी २ लाख ७९ हजार २४० रुपये व साहित्यासाठी १ लाख ५३ हजार रुपये, असे एकूण ४ लाख ३२ हजार २४० रुपये तीन वर्षांत अनुदान स्वरूपात देण्यात येतात. या योजनेसाठी गावातील किमान ५ शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने ग्रामरोजगार सेवकाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रेशीम कार्यालयाकडे प्रति एकर ५०० रुपये नोंदणी शुल्क भरून नाव नोंदणी करावी व मनरेगा योजनेअंतर्गत अर्ज सादर करावा.
अल्पभूधारक शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांना केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र-२’ योजनेत सहभागी होता येईल. या योजनेअंतर्गत १ एकर तुती लागवडीसाठी ४५ हजार रुपये, सिंचन व्यवस्थेसाठी ४५ हजार रुपये, संगोपनगृह बांधकामासाठी २ लाख ४३ हजार ७५० रुपये, संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५०० रुपये व निर्जंतुकीकरण औषधांसाठी ३ हजार ७५० रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतात. ‘सिल्क समग्र-२’ योजनेत २ एकर तुती लागवडीसाठीही अनुदान उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, समन्वय इमारत, पहिला मजला, पुतळा मैदान, जिल्हा परिषद बँकेशेजारी, मॅप्स कॉलनी, पाषाण लाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन