सिध्दार्थ बागुल अकस्मात निधन
राहुरी फॅक्टरीतील तरुण विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
राहुरी फॅक्टरी परिसरातील २३ वर्षीय विद्यार्थी सिद्धार्थ सुरेश बागुल यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी दुर्दैवी निधन झाले. या आकस्मिक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सिद्धार्थ बागुल हे अमृतवाहीनी काॅलेज ऑफ फार्मसी येथे औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) शाखेत शिक्षण घेत होते. ते अभ्यासू, मनमिळावू आणि होतकरू विद्यार्थी म्हणून ओळखले जात. महाविद्यालयात असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली; मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सिद्धार्थ यांना पुढे एम.फार्म. करून उच्च शिक्षण घ्यायचे स्वप्न होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्यांना उभारी देण्याचा त्यांचा निर्धार होता. “मला नोकरी लागली की मोठा बंगला बांधेन आणि तुम्ही नोकरी करू नका,” असे ते वडिलांना प्रेमाने सांगत असत, अशी आठवण कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यांच्या या स्वप्नाळू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वामुळे मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
सिद्धार्थ हे आनंदरुषी पंत संस्थेचे व्यवस्थापक सुरेश बागुल यांचे सुपुत्र होते. त्यांच्या अकाली जाण्याने बागुल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संध्याकाळी निर्मल धाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परिसरातील नागरिक, मित्रमंडळी व महाविद्यालयीन सहाध्यायी यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
Comments
Post a Comment