राहुरीत बेकायदेशीर ड्रोन थरार ड्रोन अस्तित्वावर शिक्कामोर्तब

राहुरीत बेकायदेशीर ड्रोनचा थरार; अँटी-ड्रोनगण पथकाचे प्रयत्न निष्फळ, मात्र ड्रोनच्या वावरावर शिक्कामोर्तब
राहुरी ।
राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद ड्रोनच्या गूढतेत रविवारी रात्री आणखी भर पडली. प्रशासनाने प्रथमच अँटी-ड्रोनगण यंत्रणेच्या माध्यमातून या ड्रोनचा मागोवा घेण्याचा आणि त्यांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला. कारवाईला यश मिळाले नसले तरी आकाशात प्रत्यक्ष ड्रोन उडत असल्याची खात्री प्रशासन आणि नागरिकांना झाली आहे.
रविवारी रात्री पुन्हा एकदा राहुरी परिसरातील नागरिकांच्या दृष्टीस आकाशात वेगाने हालचाल करणारे संशयास्पद ड्रोन पडले.  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांनी  पुणे येथील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून विशेष अँटी-ड्रोनगण पथक उपलब्ध केले असल्याने 
यानंतर देवळाली प्रवरा-त्रिंबकपूर मार्ग परिसरात राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. पुण्यावरून आलेल्या अँटी-ड्रोनगण पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने ड्रोनचा मागोवा घेत त्याला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पथकातील तज्ज्ञ संदीप जगताप यांनी ड्रोन निष्क्रिय करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना केल्या. मात्र संबंधित ड्रोन अत्यंत उंचीवर आणि उपकरणांच्या कार्यकक्षेबाहेर असल्याने त्याला पाडणे अथवा नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही.
या कारवाईदरम्यान पोलीस पथक आणि स्थानिक नागरिकांनी आकाशात एक-दोन नव्हे तर जवळपास दहा ड्रोन फिरताना पाहिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आणि अफवांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला असून परिसरात प्रत्यक्ष ड्रोन उडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, या मोहिमेनंतर नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे. ड्रोनची उपस्थिती निश्चित झाली असली तरी त्यांचा परिसरातील चोरीच्या घटनांशी अथवा अन्य गुन्हेगारी कारवायांशी थेट संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.
या मोहिमेत पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, पत्रकार शिवाजी घाडगे तसेच अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, हे ड्रोन नेमके कोण उडवत आहे, त्यामागील उद्देश काय आहे आणि संबंधित यंत्रणांची परवानगी घेण्यात आली आहे का, याचा सखोल तपास सुरू असून प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.
राहुरी तालुक्यातील आकाशात फिरणाऱ्या या रहस्यमय ड्रोनमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता, संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या तपासातून या गूढावर पडदा कधी उठतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार