पिसाळलेल्या कुत्र्या चा वृध्दाला चावा घेत ठार मारल अण्य 15 जणांना डसले

पिसाळलेल्या कुत्र्याने वृद्धाचा फाडले १५ जणांना चावा
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
 राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने झोपेत असलेल्या एका वृद्धावर अत्यंत क्रूर हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवून आणला. याच कुत्र्याने परिसरातील सुमारे १५ नागरिकांनाही चावा घेतल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत वृद्धाचे नाव साहेबराव राघुजी वाघमारे (वय ७०) असे आहे. ते आपल्या दुकानासमोर नेहमीप्रमाणे झोपलेले असताना मध्यरात्री पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. कुत्र्याने त्यांच्या शरीराचा अक्षरशः चावा घेत फाडल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्ला इतका भीषण होता की त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
मृतदेहाचे शवविच्छेदन राहुरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
१५ नागरिक जखमी; रेबीज प्रतिबंधक उपचार सुरू
वृद्धावर हल्ला केल्यानंतर या पिसाळलेल्या कुत्र्याने परिसरात धुमाकूळ घालत अनेक नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे १५ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून सर्व जखमींना रेबीज प्रतिबंधक लस  तसेच आवश्यक उपचार देण्यात येत आहेत.
प्रशासनाची धाव; कुत्र्याचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच चिंचोली गावचे सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी तसेच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
कुत्रा नेमका कोणाचा? विविध चर्चांना उधाण
या घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. संबंधित कुत्रा मोकाट होता की कोणाच्या मालकीचा, याचा शोध प्रशासन घेत आहे. तसेच शिर्डी परिसरातील भटके कुत्रे राज्य महामार्गालगतच्या गावांमध्ये आणून सोडले जात असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित कुत्रा नेमका कुठून आला आणि त्याची जबाबदारी कोणाची, याचा तपास सुरू आहे.
दहा लाखांच्या मदतीची मागणी
हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
पोलीस निरीक्षकांची सूचना
राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी वन विभाग, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांना तातडीने पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी समन्वयाने कारवाई करावी, अशा सूचना दिल्या.
गावात दहशतीचे वातावरण
या घटनेनंतर चिंचोली फाटा आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. विशेषतः शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव गंभीर स्वरूप धारण करत असल्याने प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी धोरण राबवून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रभावी नियंत्रण मिळवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments