गणेशोत्सव कसोटी पोलिसांची
गणेशोत्सवात कसोटी पोलिसांची…
भक्ती । शिवाजी घाडगे
महाराष्ट्रातील आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाने राज्यभर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनीही आकर्षक सजावट, देखावे आणि विविध सामाजिक उपक्रमांची तयारी केली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला. शुभ कार्याची सुरुवात गणेशाला वंदन करून केली जाते. गणपती म्हणजे बुद्धीची देवता. ‘सुखकर्ता, दुःखहर्ता’ म्हणून आपण बाप्पाची आराधना करतो.
मग प्रश्न एवढाच आहे बुद्धीच्या देवतेचा उत्सव आपण बुद्धीने साजरा करणार आहोत की आवाजाच्या दणदणाटात?
गणेशोत्सव आला की सर्वाधिक ताण कोणावर येतो? उत्तर स्पष्ट आहे खाकीवर!
सण कोणताही असो, पोलीस मात्र बंदोबस्तावर असतात. गणेशोत्सव, नवरात्र, मोहरम, ईद, दिवाळी, यात्रा, जत्रा, मिरवणुका, आंदोलन, निवडणुका प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाची कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर येते. स्वतःचा सण, कुटुंब, विश्रांती यांचा विचार न करता पोलीस रस्त्यावर उभे राहतात. वाहतूक नियंत्रणापासून गर्दी व्यवस्थापनापर्यंत आणि किरकोळ वादापासून गंभीर परिस्थितीपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांनाच हाताळावी लागते.
यंदाच्या गणेशोत्सवात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा अधिक संवेदनशील झाला आहे. निर्बंधांची अंमलबजावणी करताना पोलीस आणि प्रशासनाची खरी कसोटी लागणार आहे. एका बाजूला उत्सवाचा उत्साह, दुसऱ्या बाजूला नागरिकांचे आरोग्य, शांतता, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था. या सगळ्यांचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पण सगळा भार पोलिसांवरच टाकून समाजाची जबाबदारी संपते का?
नाही!
गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव आहे. त्यामुळे सार्वजनिक जबाबदारीही प्रत्येकाची आहे.
मोठमोठे मंडप उभारणे, रस्ते अडवणे, वाहतुकीची कोंडी करणे, कर्णकर्कश आवाजात सिनेमातील गाणी वाजवणे, रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धकांचा दणदणाट करणे आणि हजारो तरुणांनी त्यावर बेभान नाचणे यालाच गणेशोत्सवाचे यश मानायचे का?
मोठा आवाज म्हणजे मोठी भक्ती नाही आणि मोठी मिरवणूक म्हणजे मोठी संस्कृती नाही.
गणेशोत्सवाचा मूळ हेतू लोकांना एकत्र आणणे, सामाजिक प्रबोधन करणे, लोकशिक्षण घडवणे आणि समाजात सकारात्मक विचार रुजवणे हा होता. आज मात्र अनेक ठिकाणी उत्सवाचे स्वरूप बदलताना दिसते. देखावे आहेत, रोषणाई आहे, स्पर्धा आहेत, मोठमोठे ध्वनिक्षेपक आहेत; पण त्या सगळ्यात सामाजिक संदेश कुठे हरवतो आहे, याचाही विचार करावा लागेल.
विशेषतः तरुण पिढीबाबत चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे.
गुलालात रांगोळी किंवा अन्य पदार्थ मिसळले गेले तर डोळ्यांना इजा होऊ शकते. कानठळ्या बसविणारा डीजे कानांवर परिणाम करू शकतो. आणि त्याच तरुणाच्या तोंडात गुटखा असेल तर तोंडाचे आरोग्य धोक्यात येते.
डोळे, कान आणि तोंड ही तीन महत्त्वाची अवयव जर उत्सवाच्या नावाखाली धोक्यात येणार असतील, तर आपल्या युवा पिढीचा भविष्यकाळ सुकर कसा होणार?
क्षणभराचा जल्लोष आणि आयुष्यभराची आरोग्याची समस्या यामध्ये फरक आहे.
ध्वनीप्रदूषणाचा परिणाम फक्त कानांवर होत नाही. मोठ्या आवाजामुळे वृद्ध, लहान मुले, विद्यार्थी, आजारी व्यक्ती आणि रुग्णालयातील रुग्ण यांना मोठा त्रास होऊ शकतो. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा वेळ महत्त्वाचा असतो. रुग्णासाठी शांतता उपचाराचा भाग असते. वृद्ध व्यक्तींसाठी रात्रीची शांत झोप महत्त्वाची असते. मग आपल्या उत्सवाचा आनंद दुसऱ्याच्या त्रासावर उभा करणे योग्य आहे का?
सोशल मीडियाव आवाजामुळे तिच्या मुलीच्या कानावर परिणाम झाला. एका कानाने ऐकू येत नाही, उपचार अद्याप सुरू आहेत, असे ती सांगते.सुज्ञ नागरिकांनी सुचना करणे म्हणजेच ते विरोध आहेत असे नाही
ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर नागरिक म्हणून भूमिका मांडल्याचे वृत्तही चर्चेत आले. गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटाला विरोध केल्याने त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले आणि मारहाणीची घटनाही समोर आली. मतभेद असू शकतात; परंतु एखादा नागरिक प्रश्न विचारतो म्हणून त्याला शत्रू मानणे योग्य नाही. लोकशाहीत मतभिन्नता असते. त्यावर चर्चा होऊ शकते; हिंसा हा मार्ग नाही.
गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक उत्सवाच्या परंपरेशी जोडलेला आहे. त्या काळात या उत्सवामागे लोकजागृतीचा विचार होता. समाजाला एकत्र आणणे, स्वाभिमान जागवणे आणि सार्वजनिक जीवनात सहभाग वाढवणे हा उद्देश होता. आज त्याच उत्सवाचे रूप केवळ डीजे, डॉल्बी, लेझर आणि मिरवणुकीच्या दणदणाटात बदलले तर आपण परंपरेचा आत्मा हरवत नाही ना?
प्रश्न डीजेचा एकट्याचा नाही. प्रश्न आहे स्वयंशिस्तीचा.
नियम प्रशासनाने केले आहेत. त्यांची अंमलबजावणी पोलिसांनी करायची आहे. पण नियम पाळणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे. गणेश मंडळांनी स्वयंशिस्त दाखवली, तर पोलिसांवरील ताण निम्म्याने कमी होऊ शकतो. मंडळांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वयंसेवक नेमावेत. रुग्णवाहिका अडणार नाही याची काळजी घ्यावी. महिलांची आणि मुलांची सुरक्षितता पाहावी. ध्वनीमर्यादेचे पालन करावे. गर्दीत गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
पोलीस आपली शिस्त राखण्यासाठी आहेत; आपली शहाणपणाची जागा घेण्यासाठी नाहीत.
खाकीवर सणासुदीचा कायम ताण असतो. पोलीसही आपल्या समाजातीलच माणसे आहेत. त्यांनाही कुटुंब आहे, भावना आहेत, आरोग्य आहे. आपण बाप्पाच्या आरतीत सहभागी होत असताना एखादा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर रस्त्यावर बंदोबस्त करत असतो. त्याच्या त्यागाची जाणीव आपण ठेवणार आहोत का?
गणेशोत्सवात कसोटी पोलिसांची निश्चितच आहे; पण त्याहून मोठी कसोटी आपल्या नागरिकत्वाची आहे.
आपण बाप्पाला काय अर्पण करतो? नारळ, फुले, हार, मोदक? हे सर्व आवश्यक आहे. पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे संयम, विवेक आणि सामाजिक जबाबदारी.
गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना असावी उत्सव आनंदाचा असू दे, पण कोणाच्याही अश्रूंचे कारण ठरू नये. मिरवणूक उत्साहाची असू दे, पण रुग्णवाहिका अडकू नये. गुलाल उधळू दे, पण कोणाचे डोळे जळू नयेत. संगीत वाजू दे, पण कोणाचे कान बहिरे होऊ नयेत. तरुणाई नाचू दे, पण व्यसनांच्या आहारी जाऊ नये.
गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. त्यामुळे बाप्पाच्या उत्सवात बुद्धी हरवता कामा नये.
यंदाच्या गणेशोत्सवात खाकीची कसोटी आहे; प्रशासनाचीही कसोटी आहे; गणेश मंडळांचीही कसोटी आहे. पण सर्वांत मोठी कसोटी आपलीच आहे—
माझ्या आनंदामुळे दुसऱ्याला त्रास होत नाही ना?
हा प्रश्न प्रत्येक गणेशभक्ताने स्वतःला विचारला, तर गणेशोत्सव अधिक सुंदर होईल. पोलिसांवरील ताण कमी होईल. नागरिकांमध्ये परस्पर आदर वाढेल. तरुण पिढीला आरोग्यदायी वातावरण मिळेल आणि महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक प्रतिष्ठाही कायम राहील.
कारण शेवटी बाप्पाला दणदणाट नको; भक्ती हवी.
गोंगाट नको; संस्कार हवेत.
स्पर्धा नको; सामाजिक बांधिलकी हवी.आणि केवळ उत्सव नको; उत्सवातून समाजहित साधणारी कृती हवी.
आपला आनंद असावा
गणपतीच्या कानाएवढा मोठा
तुमची संकटे असावीत
गणपतीच्या उंदराएवढी लहान
तुमचे आयुष्य असावे
गणपतीच्या सोंडे इतके लांब
आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण असावा
Comments
Post a Comment