अहमदनगर जिल्हा बॅकेच्या बिनविरोधच्या आशा धुसुर?

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू बिनविरोध आशा धुसुर ?

खबर@ प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेच्या बिनविरोध च्या अशा मावळल्या उमेदवारी 531 हुन अधिक नामनिर्देशन पत्र नेले गेल्याने बिनविरोध खोडा येणार असल्याची चर्चा आहे 
एकीकडे दुष्काळाला पुढे करत प्रस्थापित बॅक निवडणूक बिनविरोध करु पाहत असताना 
दुसरीकडे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक ची भाऊ गर्दी वाढली असून जिल्हा बॅकच्या बिनविरोध च्या आशा मात्र धुसुर झाल्याने नेत्याचे टेन्शन  वाढले आहे 
अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., अ.नगरच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी व्यवस्थापक समितीची पंचवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत एकूण २१ संचालकांची निवड केली जाणार असून, मतदारसंघनिहाय जागांची रचना निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, सहकारी संस्था नियम १९६१, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेले परिपत्रक व आदेश तसेच संस्थेच्या मंजूर उपविधीनुसार राबविण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच त्याच उद्देशाच्या सहकारी संस्थांचा सभासद मतदारसंघ आणि तत्सम इतर संस्था मतदारसंघातून अहिल्यानगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे १४ प्रतिनिधी निवडले जाणार आहेत.
याशिवाय बिगरशेती संस्था मतदारसंघातून एक, तर शेतीपूरक, शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जाणार आहे. राखीव मतदारसंघात महिलांसाठी दोन, अनुसूचित जाती-जमातीसाठी एक, इतर मागासवर्गीयांसाठी एक तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे. अशा प्रकारे एकूण २१ जागांवर निवडणूक होणार आहे.
नामनिर्देशनासाठी महत्त्वाच्या अटी
अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या व्यक्तीलाच नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. निवडणूक कार्यालयाने मुद्रित केलेले नामनिर्देशनपत्रच स्वीकारले जाणार असून त्यातील सर्व रकाने भरणे बंधनकारक आहे. एका नामनिर्देशनपत्राची किंमत १०० रुपये असून, मतदार यादीच्या एका छायाप्रतीसाठी १ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ मधील नियम २३ नुसार उमेदवाराला २ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी ही अनामत रक्कम ५०० रुपये राहणार आहे. अनामत भरल्याची पावती नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. एका उमेदवाराने एकाच मतदारसंघात एकापेक्षा अधिक नामनिर्देशनपत्रे दाखल केली तरी अनामत रक्कम एकदाच भरावी लागणार आहे.
उमेदवाराने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील संबंधित अपात्रतेच्या तरतुदींचे पालन केलेले असणे आवश्यक आहे. संस्थेच्या मंजूर उपविधीतील पात्रताही पूर्ण करावी लागणार आहे.
किमान एक वर्ष संचालक म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
उमेदवारी करणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक समितीवर किमान एक वर्ष संचालक म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र किंवा दाखला नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवार ज्या सभासद संस्थेचे प्रतिनिधित्व करीत आहे, त्या संस्थेचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण वर्ग ‘अ’ किंवा ‘ब’ असल्याचे लेखापरीक्षकाने दिलेले प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या प्रमाणपत्राची संबंधित संस्था सचिव अथवा व्यवस्थापक यांच्या सही व शिक्क्यासह प्रमाणित प्रत जोडणे बंधनकारक आहे.
राखीव जागांसाठी जातीचा दाखला आवश्यक
अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघातून उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत नामनिर्देशनपत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवाराने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील संबंधित तरतुदीनुसार कोणतीही अपात्रता धारण केलेली नसल्याचे प्रतिज्ञापत्रही सादर करणे बंधनकारक आहे. थकबाकीदार सभासद तसेच नियमांनुसार अपात्र ठरणारे सभासद उमेदवारी करू शकणार नाहीत.
फोटो, ओळख व पत्त्याचा पुरावा आवश्यक
उमेदवाराने नामनिर्देशनपत्रावर आणि ओळखपत्रावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावणे आवश्यक आहे. त्यासोबत पत्ता व ओळखीचा पुरावाही जोडावा लागणार आहे. आधारकार्ड, निवासी पुरावा, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी यांची माहिती नामनिर्देशनपत्रात देणे आवश्यक राहील.
उमेदवाराने ज्या संस्थेचे प्रतिनिधित्व केले आहे त्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या यादीची प्रत, आवश्यक ते प्रमाणपत्र, लेखापरीक्षण वर्गाचे प्रमाणपत्र आणि संबंधित प्रतिज्ञापत्रेही सादर करावी लागणार आहेत.
मतदारसंघानुसार सूचक व अनुमोदकाची अट
सामान्य मतदारसंघातील उमेदवाराने ज्या मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीत आपले नाव आहे, त्याच मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र दाखल करावे लागणार आहे. तसेच त्याच मतदारसंघातील सूचक व अनुमोदक असणे आवश्यक आहे.
प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघासाठी तालुकानिहाय स्वतंत्र मतदार यादी व गट असल्याने संबंधित तालुक्यातील अंतिम मतदार यादीतील व्यक्तीच उमेदवार, सूचक व अनुमोदक म्हणून पात्र राहतील. मात्र राखीव मतदारसंघासाठी ही अट लागू राहणार नसून, संबंधित उमेदवाराला कोणत्याही मतदारसंघातील सूचक व अनुमोदक घेता येणार आहे.
निवडणूक चिन्हासाठी पसंती कळवावी लागणार
उमेदवाराने नामनिर्देशनपत्रात निवडणूक चिन्हाची मागणी नमूद करणे आवश्यक आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या यादीतूनच चिन्हाची निवड करावी लागणार आहे. मात्र अंतिमतः निवडणूक चिन्ह वाटप करण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राहणार आहे.
एकाच चिन्हासाठी अनेक उमेदवारांनी पसंती दर्शविल्यास प्रथम आलेल्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. या संदर्भातील निर्णय अंतिम राहणार आहे.
नामनिर्देशन छाननी व अपीलाची तरतूद
नामनिर्देशनपत्रांची छाननी करताना संबंधित कायदे, नियम आणि संस्थेच्या मंजूर उपविधीतील पात्रता-अटींची पूर्तता झाली आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. नामनिर्देशनपत्र नामंजूर झाल्यास संबंधित उमेदवाराला निर्धारित कालावधीत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तसेच विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांच्याकडे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार अपील दाखल करता येणार आहे.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी उमेदवाराने स्वतः अथवा त्याने लेखी प्राधिकृत केलेल्या सूचकामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित मुदतीत लेखी नोटीस सादर करावी लागणार आहे. उमेदवारी मागे घेतल्यानंतर ती नोटीस परत घेण्याची मुभा राहणार नाही.
निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते
निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अथवा राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. या खात्याचा संपूर्ण तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे.
तसेच निवडणूक खर्चाचा विहित नमुन्यातील हिशेब निर्धारित मुदतीत सादर करणे बंधनकारक राहणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या निवडणूक आचारसंहितेचेही संबंधित सर्व उमेदवार व घटकांना काटेकोर पालन करावे लागणार आहे.
मतदानासाठी ओळखपत्र अनिवार्य
मतदानासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या ओळखपत्रांपैकी वैध ओळखपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे. प्रत्येक मतदाराला संबंधित मतदारसंघातील निवडणुकीच्या जागेसाठी मतदानाचा अधिकार राहणार आहे.
निवडणूक प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा राहणार असून, निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, सहकारी संस्था नियम, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश व परिपत्रके, न्यायालयीन निर्णय आणि संस्थेच्या मंजूर उपविधीनुसार पार पाडण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन