मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज :अमोल इथापे
। प्रतिनिधी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात अहिल्यानगर जिल्ह्याचे मोलाचे योगदान आहे. सुमारे ७०० वर्षांपूर्वी नेवासा येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तसेच महिमभट, चक्रधर स्वामी यांच्यासह अनेक संत, साहित्यिक आणि विचारवंतांनी मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी महान कार्य केले आहे. मराठी भाषा ही मराठी माणसाच्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे प्रतीक असून, या भाषेत साहित्याचा अनमोल ठेवा आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल तथा ग्रंथमित्र अमोल इथापे यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित **‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’**निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात अहिल्यानगर जिल्ह्यातील साहित्यिकांनी लिहिलेल्या ग्रंथांचे ‘साहित्यिक रत्न’ या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी इथापे बोलत होते.
इथापे पुढे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देताना तिची सुमारे २,५०० वर्षांची परंपरा विचारात घेण्यात आली आहे. प्राचीन ग्रंथांमधील विविध लिपींमध्ये आढळणारी भाषा, व्यवहारातील भाषा तसेच विविध कलाप्रकारांमधून व्यक्त होणाऱ्या भाषेचे स्वरूप समाजासमोर यावे, मराठी भाषेचे वैभव जपले जावे, भाषेचे संवर्धन व्हावे, अभिजात भाषेची ओळख सर्वसामान्यांना व्हावी आणि मराठी भाषेबाबत संशोधनाला चालना मिळावी, या उद्देशाने जनजागृती करणे आवश्यक आहे.
याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल तथा ग्रंथमित्र अमोल इथापे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के होते. निरीक्षक रामदास शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर लिपिक संतोष कापसे यांनी आभार मानले.
या प्रसंगी संतोष वाडेकर, वसंत कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक प्रमोद गिरी, ऋषिकेश जायभाये यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वाचक व सभासद उपस्थित होते.
दरम्यान, हे ग्रंथप्रदर्शन शासकीय सुट्ट्या वगळता दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, वाचक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि अभ्यासकांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी केले आहे.
Comments
Post a Comment