भोदु अशोक खरात च्या कृत्याला देव ही घाबरला
श्रद्धेचा बाजार — शिवाजी घाडगे
सर्वसामान्य लोक देवाला घाबरून वाईट कृत्यांपासून दूर राहतात; मात्र ‘भोगू बाबा’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात यांच्या कृत्यांमुळे आता नरबळीच्या संशयापर्यंत प्रकरण पोहोचल्याची चर्चा आहे.
भक्तांना साप दाखवून भीती निर्माण करणारा, स्वतःला मोठा ‘शक्तीमान’ भासवणारा खरात याचे महिलांसोबतचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. दरम्यान, आणखीही भयावह माहिती समोर येत असून, या सर्व प्रकरणाचा तपास एसआयटी नेमक्या कोणत्या पद्धतीने करते, यावरच खरात याची सर्व कृत्ये उघड होणार आहेत. कारण हा प्रश्न महिलांच्या अब्रूशी संबंधित आहे.
नाशिक परिसरात स्वतःला ‘भोगू बाबा’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अशोक खरात यांच्या कथित कृत्यांनी समाजमन हादरले असून, श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. देव, धर्म आणि अध्यात्म यांच्या नावाखाली घडलेल्या या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्यतः लोक वाईट कृत्य टाळण्यासाठी देवाची भीती बाळगतात; मात्र याच देवाला साक्षी ठेवून अमानवी आणि अघोरी कृत्य केल्याचे आरोप अशोक खरात यांच्यावर आहेत. काहींनी तर सत्ताप्राप्तीसाठी त्याच्याकडून अघोरी विधी करून घेतल्याचीही चर्चा आहे; तर आणखी किती जण त्याच्या जाळ्यात अडकले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वर्षभरापूर्वी त्याच्या कथित कृत्यांचे काही व्हिडिओ क्लिप्स समोर आले होते. या व्हिडिओंमुळे त्याच्या तथाकथित ‘आध्यात्मिक’ कार्यामागील वास्तव उघड होऊ लागले.
कोणत्याही पापाचा घडा भरायला वेळ लागतो; मात्र एकदा तो भरला की कारवाई अटळ ठरते. कार्यालयीन कर्मचारी नीरज जाधव यांच्या घरापर्यंत या प्रकरणाची धागेदोरे पोहोचले आणि त्यानंतर कारवाईला वेग आला. ‘दिल्ली दरबारातील’ काही नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून स्वतःचे वजन दाखवण्याचा प्रयत्न झाला; मात्र अखेरीस कायद्याच्या कचाट्यातून सुटका होऊ शकली नाही. न्यायालयाने कोठडीत वाढ केल्यानंतर पीडित व्यक्ती पुढे येऊन तक्रारी दाखल करू लागल्या आहेत.
जमिनीचे उतारे बनवून देण्याच्या नावाखाली स्वतःच्या कुटुंबीयांच्या नावावर मालमत्ता वळविल्याचेही आरोप समोर येत आहेत. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीयांचाही यात सहभाग असल्याची चर्चा आहे. अधिकृत आकडेवारीनुसार खरात यांची सुमारे ४० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात ती यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, काही शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच मंत्री आणि राजकीय नेते यांची त्याच्याकडे नियमित ये-जा असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधांमुळे खरात याला एक प्रकारचा फाजील आत्मविश्वास मिळाला होता, अशी चर्चा परिसरात रंगत आहे.
अंकशास्त्र आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांना आकर्षित करणारा अशोक खरात हळूहळू ‘अंगशास्त्र’ या नावाखाली वेगळ्याच मार्गावर गेला, असे आरोप होत आहेत. त्याच्याशी संबंधित शंभरहून अधिक व्हिडिओ क्लिप्स समोर आल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे तो अखेर अडकला.
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर येत आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात ‘नरबळी’चा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती अधिकच गंभीर बनली असून, तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहे.
या संपूर्ण घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. श्रद्धा ही वैयक्तिक बाब असली तरी तिचा गैरफायदा घेऊन फसवणूक किंवा अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment