भोगू कॅप्टन अशोक खरात वर गुन्हे वाढ मुलगा अटक कुटुंब गोत्यात

भोगू कॅप्टन अशोक खरात गुन्हे वाढले; कुटुंबीयांवरही कारवाईची छाया मुलगा अटक 
श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे 
स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना आणि 
आणखी तिघांविरुद्ध फसवणूक तसेच बेकायदेशीर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एकेकाळी भक्तांच्या समस्या चुटकीसरशी सोडवणारा म्हणून प्रसिद्ध असलेला खरात आज मात्र कारागृहात आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे प्रकरणाची व्याप्ती केवळ अशोक खरातपुरती मर्यादित न राहता कुटुंबीयांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तपासात उघड होत असलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने तथाकथित ‘अघोरी शक्ती’ आणि अंधश्रद्धेच्या आड एक प्रकारचे व्यावसायिक मॉडेल उभे केले होते. सत्ता, मनासारखी बदली किंवा पोस्टिंग, जमीन-जुमला, संपत्ती, तसेच वैयक्तिक आणि लैंगिक समाधान अशा विविध ‘सेवा’ देण्याचे आमिष दाखवून तो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता. ग्राहकाच्या आर्थिक स्थितीनुसार त्याचे ‘रेट’ ठरवले जात असल्याचेही समोर आले आहे.
श्रीमंत भक्तांसाठी सांकेतिक भाषा, विशेष वागणूक आणि त्याबदल्यात मोठ्या रकमेची उकळणी केली जात होती. लाखो रुपयांच्या गाड्या, जमिनीतील भागीदारी, फ्लॅट्स तसेच अमावस्या आणि पौर्णिमेच्या पूजा यासाठीही मोठ्या रकमांची देवाणघेवाण होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
खरातने उभे केलेले हे जाळे इतके मोठे होते की त्यात राजकारणी, अधिकारी, व्यावसायिक आणि काही महिला यांचाही समावेश होता. याच दरम्यान काही महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप समोर आले असून, त्यासंबंधित व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे.
अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध प्रकारचे पदार्थ, औषधे किंवा ‘शक्तिवर्धक’ म्हणून दिले जाणारे घटक वापरून लोकांची फसवणूक केली जात असल्याचेही तपासातून उघड झाले आहे.
एकदा गुन्हे दाखल झाल्यानंतर, फसवणूक झालेल्या अन्य व्यक्तीही पुढे येत असून, तक्रारींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अशोक खरात याच्या अडचणी आणखी वाढत आहेत.
आज पुन्हा अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, नव्याने गुन्हे नोंद झाल्याने त्याची न्यायालयीन अडचण अधिकच गंभीर होत चालली आहे. त्याच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर, पत्नी आणि इतर कुटुंबीयांच्या नावावर झालेले व्यवहारही तपासाच्या कक्षेत आले आहेत.
दरम्यान, खरातच्या संस्थेचे विश्वस्त, तसेच देवस्थानासाठी सरकारकडून मिळालेल्या निधीचा वापर याबाबतही विशेष तपास पथक  सखोल चौकशी करत आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर