अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात शिरुरच्या डाॅक्टर अटकेत

अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात शिरुरच्या डॉक्टरला अटक; आरोपींची संख्या 24 वर
घाडगे न्यूज प्रतिनिधी : 
अवैध गर्भलिंग निदान चाचण्या आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी दाखल गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडून या संपूर्ण रॅकेटचा अतिशय बारकाईने तपास सुरू आहे. तपासादरम्यान अनेक डॉक्टर, मेडिकल चालक तसेच एजंट यांचा या गैरप्रकारांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचे धागेदोरे आता विविध जिल्ह्यांपर्यंत पोहोचत असल्याने तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्या डॉक्टर, एजंट आणि मेडिकल चालकांची चौकशी केली असता तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा तांत्रिक तपास केल्यानंतर विविध तालुक्यांमध्ये एजंटचे जाळे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यात आता आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव डॉ. ज्ञानेश्वर नायकोडी (वय 54 वर्षे), बीएएमएस, रा. शिरूर, जि. पुणे असे आहे. सदर डॉक्टर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत गर्भवती महिलांना त्यांच्याकडे कोण पाठवत होते, या साखळीत कोणते एजंट सहभागी होते, तसेच आतापर्यंत किती महिलांच्या अवैध गर्भलिंग निदान चाचण्या आणि गर्भपात करण्यात आले, याचा सखोल तपास केला जाणार आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 24 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये 8 डॉक्टरांचा समावेश आहे. याशिवाय 3 मेडिकल चालक तसेच वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या पुरवठादारालाही अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी अवैध गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारी एकूण 6 सोनोग्राफी यंत्रे विविध ठिकाणांहून आणि विविध आरोपींकडून जप्त केली आहेत. तसेच चार चारचाकी वाहने आणि एक दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे करीत आहेत.
या कारवाईमुळे राज्यभरात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या रॅकेटविरोधातील मोहिमेला अधिक बळ मिळाले असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन