जिल्हा बँक निवडणुकीत 14 हरकती
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९०३ उमेदवारी अर्ज; १४ हरकती दाखल
अहिल्यानगर । प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला चांगलीच रंगत आली असून, तब्बल ९०३ उमेदवारी नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. त्यामुळे बँकेच्या २१ संचालकपदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार राहुल जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे व मोनिका राजळे यांच्या उमेदवारी अर्जांवरही आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या या बँकेच्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. बँकेच्या माध्यमातून होणारी मोठी आर्थिक उलाढाल आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर असलेला प्रभाव यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पाहुणे-माहुणे, पक्ष-सोयरे-धायरे यांचे राजकारणही पाहायला मिळत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू झाली असून, मंगळवारी विविध मतदारसंघांतील उमेदवारी अर्जांवर एकूण १४ हरकती दाखल करण्यात आल्या. त्यामुळे या हरकतींवर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
विकास संस्था मतदारसंघात सर्वाधिक हरकती
दाखल झालेल्या हरकतींपैकी विकास संस्था मतदारसंघात संगमनेर येथे एक, पाथर्डी एक, राहाता दोन, कोपरगाव दोन, अकोले एक आणि श्रीगोंदा येथे दोन हरकती दाखल झाल्या आहेत.
याशिवाय बिगरशेती मतदारसंघात दोन, एससी-एसटी मतदारसंघात एक, महिला मतदारसंघात एक आणि इमाव मतदारसंघात एक हरकत दाखल झाली आहे.
अशा प्रकारे एकूण १४ हरकती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाल्या आहेत.
आता या हरकतींच्या निर्णयानंतर कोणते उमेदवारी अर्ज कायम राहतात आणि कोणते अर्ज बाद होतात, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर माघारीच्या प्रक्रियेला सुरुवात होऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे. ९०३ उमेदवारी अर्जांमुळे सुरू झालेली ही निवडणूक प्रक्रिया पुढील काळात आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
Comments
Post a Comment