जिल्हा बॅके साठी खासदारांची खास आघाडी
जिल्हा सहकारी बँकेसाठी खासदारांची खास आघाडी!
अहिल्यानगर | विशेष प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत साखर कारखानदारांनी एकजूट केल्यानंतर आता जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये बाजूला पडलेल्या घटकांनीही एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय या गटाने घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात पर्यायी आघाडी उभी राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या घडामोडींमुळे बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत साखर कारखानदार आणि प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता या सत्तासमीकरणांना पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील नेते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार एकत्र येत आहेत. समविचारी घटकांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती या बैठकीत आखण्यात आली.
शिंदे गटाची विरोधी आघाडीला साथ; खासदार वाकचौरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
या घडामोडींमध्ये विशेष लक्षवेधी बाब म्हणजे राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) काही घटकांनी विरोधी आघाडीसोबत जाण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. मात्र, या गटाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. जिल्हा बँकेसाठी शिंदे गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, त्यावेळीही खासदार वाकचौरे उपस्थित नव्हते.
शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः या गटातील आमदार विठ्ठलराव लंघे आणि आमदार अमोल खताळ यांच्या राजकीय भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. तथापि, त्यांच्या संबंधित मतदारसंघांतील दोन्ही जागा बिनविरोध झाल्याने या घडामोडींचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
विरोधी पॅनल उभारण्यासाठी नेत्यांची बैठक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विरोधी पॅनल तयार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची प्राथमिक बैठक एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला खासदार नीलेश लंके, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार राहुल जगताप, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रताप ढाकणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष सिताराम काकडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे, माजी सदस्य शिवशंकर राजळे, माजी सभापती बाळासाहेब हराळ, जिल्हा बँकेचे माजी संचालक अमित भांगरे, पूर्वाश्रमीचे थोरात समर्थक बाळासाहेब साळुंखे, बाळासाहेब विखे, सुधीर मस्के, एकनाथ घोगरे, अमृत धुमाळ, रावसाहेब खेवरे, किसन लोटके, रामेश्वर निमसे, अंकुश उगले आणि साहिल खर्डे यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार व मतदार उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक एकत्रितपणे लढविणे, समविचारी उमेदवारांना सोबत घेणे आणि विविध मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणे यावर चर्चा झाल्याचे समजते. आगामी काळात उमेदवारांची निवड आणि पॅनलची अंतिम रचना याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
'जिल्हा बँक सर्वसामान्य शेतकऱ्यांची राहिली पाहिजे'
बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष सिताराम काकडे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. सर्वसामान्य शेतकरी सभासदांचीही बँकेच्या निवडणुकीत बदल घडविण्याची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा बँक ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक सेवा आणि सुविधांचा लाभ शेतकरी सभासदांना प्राधान्याने मिळाला पाहिजे, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. मात्र, आज बँकेवर ठरावीक कारखानदार आणि भांडवलदारांचे वर्चस्व असल्याची टीका करत हे चित्र बदलण्यासाठी निवडणुकीत ताकदीने उतरायचे ठरल्याचे काकडे यांनी सांगितले.
त्यामुळे आगामी निवडणुकीत शेतकरी सभासदांचे हित, बँकेच्या कारभारातील सहभाग आणि विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळवून देणे, हे मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती विरोधी आघाडी आखत आहे.
बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना अर्जांच्या विक्रमी संख्येचे आव्हान
काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखे आणि काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर येथे बैठक झाली होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी या बैठकीत प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या पुढे आली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. छाननी प्रक्रियेनंतर वैध अर्जांची संख्या २३९ इतकी राहिली आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर असल्याने त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
माघारीनंतरच आघाडीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध राजकीय गटांकडून एकत्रित पॅनल उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साखर कारखानदारांची एकजूट, खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आकाराला येत असलेली विरोधी आघाडी, तसेच विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिका यामुळे निवडणूक अधिक चर्चेत आली आहे.
आता उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत कोणते नेते एकत्र येतात, कोणत्या मतदारसंघांत उमेदवार कायम राहतात आणि विरोधी आघाडीचे अंतिम स्वरूप काय असेल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात या नव्या आघाडीची भूमिका काय ठरते, हे माघारीनंतर स्पष्ट होईल.
Comments
Post a Comment