मृदविज्ञान कार्यशाळा एम पी के व्ही

महात्मा फुले कृषि विद्यापीठात मृद विज्ञानच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे  शाश्वत शेती व अन्य सुरक्षा यासाठी मृदा व्यवस्थापन या विषयावर मृद विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्यामार्फत दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा  9 ते 10 जानेवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपट पवार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी परभणी येथील मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. ए वेलमुरुगन, पुणे येथील नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक डॉ. रश्मी दरड, बारामती येथील राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी, नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन नियोजनाचे संचालक डॉ. एन.जी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत  बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये मृदा व्यवस्थापन, माती व पाणी संवर्धन, जमिनीतील जैवविविधता, डिजिटल सॉईल सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा मृदविज्ञानामध्ये वापर करणे, सेंद्रिय शेती, काटेकोर शेती, क्षारयुक्त जमिनींचे व्यवस्थापन, मृद सर्वेक्षण व भूमि नियोजन व माती मृदव्यवस्थापना संदर्भातील धोरणात्मक निर्णय या विषयावर झालेले संशोधन याविषयीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. 

Comments