अहिल्यानगरात काॅफी रेव्ह पार्टी निवेदनानंतर रद्द

अहिल्यानगरात प्रस्तावित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द; निवेदनानंतर रद्द 
घाडगे न्यूज। प्रतिनिधी 
मोठ्या शहरांमध्ये अधूनमधून रेव्ह पार्ट्यांचे आयोजन होत असल्याच्या घटना समोर येत असतात. अशा कार्यक्रमांचे नियोजन प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मर्यादित गटांमध्ये केले जाते. काही ठिकाणी अशा कार्यक्रमांवर कारवाई झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत.
दरम्यान, अहिल्यानगरमध्ये “कॉफी रेव्ह पार्टी” नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम पोस्टद्वारे प्रसारित झाली. ही बाब काही हिंदू संघटनांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवार, १४ फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन डे) रोजी नगर शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू होती. संबंधित जाहिरातीत महाविद्यालयीन तरुणींसाठी कमी शुल्कात प्रवेश दिला जाणार असल्याचा उल्लेख होता. तसेच संपर्कासाठी काही क्रमांकही देण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाबाबत संभाव्य गैरप्रकारांची चौकशी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर अवघ्या काही वेळातच आयोजकांकडून कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती जाहीर करण्यात आली.
या घटनेनंतर शहरात विविध प्रतिक्रिया उमटत असून, सोशल मीडियावरील कार्यक्रमांविषयी प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य टाळण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती तपासणी व उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन