मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पदवी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ मानद पदवीचा बहुमान
घाडगे न्यूज । प्रतिनिधी
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात रविवारी सकाळी १० वाजता हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येणार असून राज्याच्या प्रशासनात तसेच विकासाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाची दखल घेत हा गौरव केला जात आहे.
सन १९६९ मध्ये स्थापन झालेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे राज्यातील अग्रगण्य कृषी शिक्षण व संशोधन केंद्र आहे. शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्ताराच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांमधील शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विद्यापीठ करत आहे.
विद्यापीठाच्या वतीने दर दोन वर्षांनी दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात कृषी व इतर शाखांतील पदवीधरांना राज्यपाल तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पदव्या प्रदान केल्या जातात. याच वेळी कृषी, विज्ञान, समाजकारण, प्रशासन व सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही मानद डॉक्टरेट देऊन गौरविण्याची परंपरा विद्यापीठाने जपली आहे.
विद्यापीठाने स्थापनेपासून गेल्या ५५ वर्षांत आतापर्यंत २६ मान्यवरांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे. या मान्यवरांमध्ये कृषी क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन, तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज नेते शरद पवार, नितीन गडकरी, डी. वाय. पाटील, पोपटराव पवार आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांसारख्या व्यक्तींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या सन्मानात विखे-पाटील कुटुंबातील तिघांना, तर पवार कुटुंबातील दोघांना मानद पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यामुळे कृषी, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची नोंद या विद्यापीठाच्या इतिहासात ठळकपणे दिसून येते.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा सन्मान मिळणार असल्याने विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कृषी क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय, शेतकरीहिताच्या योजना आणि राज्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान केला जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment