माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अपक्ष राहुरी पोटनिवडणूक लढवणार?
घाडगे न्यूज ।विशेष प्रतिनिधी
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. राज्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये जोर धरू लागली आहे.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, शेजारील मतदारसंघातील शंकरराव गडाख यांनी ज्या पद्धतीने अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला आणि नंतर सत्तेत सहभागी होत मंत्रीपदही मिळवले, त्याच धर्तीवर प्राजक्त तनपुरेही आपला राजकीय डाव आखत आहेत. त्यामुळे ‘गडाख पॅटर्न’चा अवलंब करत तनपुरे अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपक्ष लढवली तर आतुन आपल्याला मदत होईल
दरम्यान,प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेवर पाठवले जाईल, अशीही चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, जर त्यांनी निवडणूक लढवली नाही तरच मात्र कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊन असंतोष वाढू शकतो, या भीतीमुळेच ते प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा निर्णय अपक्ष म्हणूनच असेल, अशी सध्याची परिस्थिती आहे.
यामुळे राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता आता जवळपास मावळल्या असून, बहुकोनी लढत रंगण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, तनपुरे ‘तुतारी’ऐवजी ‘छत्री’ या चिन्हाखाली लढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याचा थेट परिणाम राजकीय समीकरणांवर होऊ शकतो.
दरम्यान, तनपुरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यास भाजपाकडून अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तसेच शिवसेनेकडून राजू शेटे हे देखील आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत.
याशिवाय, वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके यांची नावेही चर्चेत आहेत. काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार का, आणि लढवलीच तर उमेदवार कोण असेल, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कोणाला उमेदवारी देते, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्राजक्त तनपुरे यांचा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कितपत योग्य ठरेल, हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याच्या घडीला त्यांच्या या भूमिकेमुळे राहुरीच्या राजकारणात अनिश्चितता आणि उत्सुकता दोन्ही वाढल्या आहेत.
Comments
Post a Comment