भोगू कॅप्टन अशोक खरात ची कल्पना कोणी पाहीली ?
श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे
नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक तपशील समोर येत असून, तपासाची व्याप्ती आता केवळ अशोक खरातपुरती मर्यादित न राहता त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे.
जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर विशेष तपास पथक अशोक खरातच्या बंगल्यावर कारवाईसाठी गेले असता त्याची पत्नी कल्पना खरात हिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ती तेथून फरार झाली. यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली असून, तिचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. या कारवाईमुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात तसेच आणखी तीन जणांविरुद्ध फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, गुरुवारी पुन्हा एका महिलेने अशोक खरातविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशोक खरातला न्यायालयात प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी बुधवारी न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती.
दरम्यान, हळूहळू अत्याचारग्रस्त महिला पुढे येत असून, अशोक खरातविरुद्ध तक्रारींची संख्या वाढत आहे. त्याच्याविरोधात दररोज नव्या आणि धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
विशेष म्हणजे, जेव्हा एसआयटीने अशोक खरातला अटक केली होती, तेव्हा त्याची पत्नी कल्पना खरात उघडपणे पुढे येत आपल्या पतीला फसवण्यात आल्याचा दावा करत होती.
तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला असून, कल्पना खरातच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. ही मालमत्ता नेमकी कशी उभी राहिली, याचाही तपास सुरू आहे. महागड्या गाड्या, सोने आणि इतर संपत्तीबाबतही चौकशी केली जात आहे.
एकेकाळी अशोक खरातच्या ‘भक्तगणां’कडून त्याची पदपूजा केली जात होती, तसेच कल्पना खरातलाही मान दिला जात होता. मात्र, सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, तीच कल्पना खरात लपून कोणाच्या घरात बसली आहे याचा शोध पोलीस घेत
असल्याचे चित्र आहे.
फसवणुकीपासून सुरू झालेलं हे प्रकरण आता अत्याचार, बेकायदेशीर सावकारकी आणि संपत्तीच्या गूढ उभारणीपर्यंत पोहोचलं आहे. एसआयटी जेव्हा खरातच्या बंगल्यावर धडकली, तेव्हा त्याची पत्नी कल्पना खरात पोलिसांच्या हातातून निसटली. आज तिच्यावर ‘लुकआऊट नोटीस’ जारी झाली आहे. कालपर्यंत जी बाई उघडपणे पुढे येऊन “माझ्या नवऱ्याला फसवलं” असा कांगावा करत होती, तीच आज फरार — हीच या प्रकरणाची खरी कहाणी सांगणारी बाब आहे.
मंगळवारी रात्री मुलगा हर्षवर्धन यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. म्हणजेच, हे प्रकरण आता केवळ अशोक खरातपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर संपूर्ण कुटुंबाभोवती संशयाचं वर्तुळ घट्ट होत चाललं आहे.
दरम्यान, दररोज नवीन महिला पुढे येत आहेत आणि अत्याचाराच्या तक्रारी दाखल करत आहेत. हा फक्त एक व्यक्तीचा गुन्हा आहे की व्यवस्थित उभं केलेलं जाळं? हा प्रश्न आता अधिक गंभीर बनत आहे. न्यायालयीन प्रक्रियेतही परिस्थिती स्पष्ट दिसते कधी पोलीस कोठडी, कधी न्यायालयीन कोठडी पण खरातच्या अडचणी मात्र वाढतच आहेत.
याहून धक्कादायक बाब म्हणजे कल्पना खरातच्या नावावर असलेली कोट्यवधींची मालमत्ता. महागड्या गाड्या, सोन्याचे दागिने, ऐषआरामाचं जीवन हे सगळं नेमकं कुठून आलं? हा पैसा श्रद्धेचा की फसवणुकीचा? हा प्रश्न आता थेट समाजासमोर उभा आहे.
एकेकाळी भक्तगणांनी ज्यांची पदपूजा केली, त्यांच्यावरच आज संशयाची सावली आहे. कालपर्यंत “देवमाणूस” म्हणून गौरवले जाणारे खरात आज गुन्हेगारांच्या पिंजऱ्यात उभा आहे, आणि त्यांची साथ देणारी कल्पना आज चेहरा लपवत पळते आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत कल्पना खरात एसआयटीसमोर हजर होत नाही, तोपर्यंत या प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरितच राहणार आहेत. आणि तोपर्यंत अशोक खरात व त्याचा मुलगा हर्षवर्धन यांचा जेलमधील मुक्काम वाढत राहणार, हेही तितकंच स्पष्ट आहे.
आता प्रश्न फक्त इतकाच उरतो
एसआयटीची पुढची धडक कोणाच्या दारात पडणार? आणि या “भोगू साम्राज्या”चे अजून किती चेहरे उघड होणार?
Comments
Post a Comment