गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी संख्या 16 वर पोहचली

गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपींची संख्या १६ वर
@प्रतिनिधी 
बेकायदेशीर सोनोग्राफी रॅकेटचा पर्दाफाश; पाच डॉक्टरांसह आरोपी जाळ्यात
राहाता तालुक्यात उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता १६ वर पोहोचली असून, त्यामध्ये पाच डॉक्टरांचा समावेश आहे. गर्भलिंग तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर सोनोग्राफी मशीनच्या साखळीचा उलगडा करण्यात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात सोनोग्राफी मशीनचा उपयोग गर्भातील बाळाची व रुग्णांची अचूक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी केला जातो. मात्र, याच यंत्रांचा गैरवापर करून गर्भलिंग निदानाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात यापूर्वी १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये तीन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांच्या कुटुंबीयांचा समावेश होता.
तपासादरम्यान पोलिसांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी वापरली जाणारी दोन सोनोग्राफी मशीन जप्त केली आहेत. त्यापैकी एक मशीन नेवासा येथील आरोपी डॉक्टर भणगे यांच्याकडून, तर दुसरे मशीन अटक आरोपी रवींद्र ढगे याच्याकडून जप्त करण्यात आले. तपासात ही दोन्ही यंत्रे अधिकृत नोंदणीशिवाय वापरली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या मशीनची खरेदी नेमकी कुठून करण्यात आली, याबाबत आरोपींकडे पोलीस कोठडीत सखोल चौकशी करण्यात आली. त्यानुसार, ही यंत्रे पुणे जिल्ह्यातील दोन डॉक्टर व एका व्यक्तीकडून खरेदी केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पुढील आरोपींना अटक केली आहे.
डॉ. आकाश सुभाष मलगुंडे, शिरूर, जि. पुणे
डॉ. नीलकंठ अशोक जाधव, लोहगाव, जि. पुणे
नरेंद्र साहेबराव ठाकरे, केसनंदगाव, ता. हवेली, जि. पुणे
या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन लोणी पोलीस ठाण्यात आणले आणि संबंधित गुन्ह्यात अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, पुण्यातील आरोपींनी ही प्रतिबंधित सोनोग्राफी मशीन नेमकी कुठून मिळवली, या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता लोणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये राज्याबाहेरील किंवा अन्य जिल्ह्यांतील नेटवर्क कार्यरत होते का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
या कारवाईमुळे बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रशासन अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. समाजात मुलगा-मुलगी भेदभाव कायम ठेवणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर