राहुरीचे आमदार अक्षय कर्डीले
राजरंग।शिवाजी घाडगे
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपाचा गड कायम राखला आहे. कर्डीले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर तब्बल १,१२,५८७ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. आहे अक्षय कर्डीले यांनी भाजपा युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पुर्ण केली असून जिल्हा सहकारी बँक चे संचालक म्हणून देखील काम केले असून
लेकरासाठी आई फिरली मतदारसंघात… दुःख बाजूला ठेवून उभा राहिलेला संघर्ष
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक हृदयस्पर्शी चित्र संपूर्ण मतदारसंघाने अनुभवले. पतीच्या निधनाचे दुःख मनात दडपून, लेकराच्या भवितव्यासाठी आई स्वतः रस्त्यावर उतरली… आणि याच भावनिक क्षणांनी प्रचाराला वेगळीच ऊर्मी दिली.
दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आयुष्यभर जनतेसाठी झटणारे कर्डीले यांनी जवळपास तीस वर्षे आमदार म्हणून काम केले, पण त्यांनी कधीच घराचा उंबरठा ओलांडून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नव्हता. मात्र परिस्थिती बदलली… आणि त्याच घरातून आता आईनेच जबाबदारी उचलली.
अक्षय कर्डीले यांच्या विजयासाठी त्यांच्या आई अलकाताईंनी पतीच्या आठवणींचे ओझे मनात ठेवत, मतदारसंघ पिंजून काढला. प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यात जाऊन त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यांच्या डोळ्यांतून दिसणारे दुःख आणि लेकरासाठीची झुंज—या दोन्ही भावना मतदारांच्या मनाला भिडत होत्या.
पत्नी प्रियंका कर्डीले यांनीही आपल्या लहानगी शिवगामिनीला सोबत घेत, भर उन्हात प्रचाराची धुरा सांभाळली. आई म्हणून आणि पत्नी म्हणून दोन्ही भूमिका निभावत त्यांनी दाखवलेली जिद्द प्रत्येकाला प्रेरणा देणारी ठरली.
या संघर्षमय प्रवासात कुटुंबातील इतर सदस्यही खंबीरपणे उभे राहिले. नगरच्या महापौर ज्योती गाडे, नगरसेविका सुवर्णा कोतकर, नगरसेविका शीतल जगताप यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. तसेच मेहुणे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, माजी महापौर संदीप कोतकर आणि शिवसेनेचे अमोल गाडे यांनीही प्रचारात योगदान देत कुटुंबाला बळ दिले.
ही केवळ एक निवडणूक नव्हती… हा एका कुटुंबाचा संघर्ष होता, दुःखातून उभं राहण्याचा प्रयत्न होता, आणि लेकरासाठी आईने दिलेल्या लढ्याची जिवंत कहाणी होती.
अक्षय कर्डीले यांना एकूण १,४०,०९३ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार गोविंद मोकाटे यांना २७,५०६ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना ५,६९० मते मिळाली. अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना ७,२९९ मते, सुरेश लांबे यांना १,३६८ मते, महेश हापसे यांना २,०५१ मते, अर्थव म्हसे यांना १,०४८ मते, तर ‘नोटा’ला १,६३३ मते मिळाली.
दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपाने अक्षय कर्डीले यांना उमेदवारी दिली होती. सहानुभूतीची लाट आणि मजबूत संघटनबळ यांच्या जोरावर त्यांचा हा विजय एकतर्फी ठरल्याचे दिसून आले.
भाजपाने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची मानून जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून गोविंद मोकाटे यांचा प्रचार मर्यादित राहिल्याचे दिसले. खासदार निलेश लंके यांनी प्रयत्न केले, मात्र त्याचा प्रभाव अपेक्षित प्रमाणात जाणवला नाही. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले, तर मित्रपक्षांचाही सहभाग मर्यादित राहिला.
वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि सुजित आंबेडकर यांनी सभा घेतल्या. निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला; मात्र त्यांच्या उमेदवाराला अपेक्षित मते मिळाली नाहीत.
विजयानंतरची प्रतिक्रिया
विजयानंतर अक्षय कर्डीले म्हणाले, “आज आमदार झालो असलो तरी मनात वेदना आहेत. माझे वडील दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांनी गेल्या तीस वर्षांत जनतेत जी नाळ निर्माण केली, त्याचेच हे फळ आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहीन. हा विजय जनतेला, पक्षाला आणि माझ्या वडिलांना समर्पित करतो.”
वाढदिवशी आमदारकीची भेट
विशेष म्हणजे, आज अक्षय कर्डीले यांचा वाढदिवस असून ते ३१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मतदारांनी त्यांना वाढदिवशी आमदारकीची अनोखी भेट दिली.
मतमोजणी व उत्सव
सोमवारी राहुरी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दुपारनंतर निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी अक्षय कर्डीले यांच्या विजयानाची अधिकृत घोषणा करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
दरम्यान आमदार अक्षय कर्डीले व आमदार विवेक कोल्हे यांच्या रुपाने जिल्ह्यातील दोन युवा नेतृत्व भाजपाला मिळाले आहेत
Comments
Post a Comment