महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या यंत्राला पेटेंट

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या कृषि यंत्राला पेटंट
राहुरी । प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत संशोधित करण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टरचलित स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित’ या कृषि यंत्राला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट प्रदान करण्यात आले आहे.
या यंत्राच्या संशोधनामध्ये अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड यांच्यासह डॉ. संजय भांगरे, डॉ. रवीकिरण राठोड आणि इंजि. रोहित गेठे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
सदर यंत्र ५५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे सहज चालवता येते. स्पेड नांगर व तव्याच्या कुळवाच्या एकत्रित मशागतीद्वारे पेरणीयोग्य जमीन तयार करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरते. या यंत्राच्या वापरामुळे मशागतीसाठी लागणारा खर्च आणि वेळ दोन्हीमध्ये बचत होते. एका तासात सुमारे ०.३३ हेक्टर क्षेत्रावर मशागत करता येते. तसेच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत मशागतीच्या खर्चात सुमारे ४४ टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
एकत्रित मशागतीसाठी विकसित करण्यात आलेल्या या ‘ट्रॅक्टरचलित फुले स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित’ यंत्राची राज्यस्तरीय संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठक-२०२५ मध्ये प्रसारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील उपमहासंचालक (कृषि अभियंत्रिकी) डॉ. एस. एन. झा, सहाय्यक महासंचालक डॉ. के. पी. सिंग, भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी. आर. मेहता, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे संचालक डॉ. पी. एन. अग्रवाल तसेच डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी पेटंट प्राप्त करणाऱ्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन