तटकरे सिल्व्हर ओक वर भेटीला
सिल्व्हर भेटी।शिवाजी घाडगे
महाराष्ट्राच्या राजकारणात काही भेटी या केवळ शिष्टाचारापुरत्या नसतात; त्या अनेक राजकीय संकेत देऊन जातात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ येथे घेतलेली भेट ही अशाच प्रकारची मानली जात आहे. वरकरणी साधी वाटणारी ही भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करणारी ठरली आहे.
अजित पवार यांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली गेली. त्यानंतर सत्तेतील समीकरणे बदलली, निष्ठा बदलल्या आणि अनेक नेत्यांचे राजकीय वजन नव्याने मोजले जाऊ लागले. या प्रक्रियेत सुनील तटकरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांनाही सतत राजकीय दबावाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षांतर्गत कोडमारी, सोशल मीडियावरील टीका, विविध वादांमध्ये नाव ओढले जाणे आणि कार्यकारिणीतील बदलांच्या चर्चा यामुळे तटकरे यांच्याभोवती अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना बाजूला करण्यात आल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण आणखी तापवले. अशा परिस्थितीत तटकरे यांनी थेट शरद पवारांची भेट घेणे हे केवळ योगायोग मानणे कठीण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे आजही संवाद, रणनीती आणि राजकीय पुनर्रचनेचे केंद्रबिंदू मानले जातात. त्यामुळे ‘सिल्व्हर ओक’वर झालेली प्रत्येक भेट राजकीय अर्थ घेऊनच पाहिली जाते.
राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात; असतात ते फक्त हितसंबंध आणि परिस्थितीनुसार बदलणारी समीकरणे. त्यामुळे तटकरे यांच्या भेटीकडे अनेकजण भविष्यातील संभाव्य राजकीय घडामोडींच्या दृष्टीने पाहत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पक्षसंघटनेतील बदल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरते.
आज महाराष्ट्रातील मतदार केवळ नेत्यांच्या भाषणांकडे पाहत नाहीत, तर त्यांच्या हालचालींमधील संकेतही बारकाईने वाचत आहेत. त्यामुळे तटकरे यांच्या ‘सिल्व्हर ओक’ भेटीने निर्माण झालेली चर्चा ही केवळ एका नेत्याच्या भेटीपुरती मर्यादित नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय दिशेची चाहूल मानली जात आहे. आगामी काळात या भेटीचे पडसाद राज्याच्या राजकारणात कितपत उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments
Post a Comment