भाजपाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या अंगावर बिनविरोध गुलाल?
घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत नगराध्यक्ष करण ससाणे आणि मच्छिंद्र धुमाळ यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहे. उर्वरित उमेदवार कमलेश गांधी आणि दत्तात्रय पानसरे यांची मनधरणी सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
करण ससाणे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक जवळपास एकतर्फी झाल्याचे मानले जात आहे. उर्वरित दोन्ही उमेदवारांनीही माघार घेतल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातून प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित होईल. त्यामुळे विधान परिषदेत अहिल्यानगरचे खाते प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने उघडले जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर अहिल्यानगर जागेची जबाबदारी सोपविली होती. स्थानिक पातळीवरील समन्वय साधत त्यांनी संभाव्य बंडखोरी टाळण्यात यश मिळविल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप आणि महायुतीसाठी ही जागा बिनविरोध मिळविण्याचा प्रयत्न अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे दिसत आहे.
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष उर्वरित उमेदवारांच्या निर्णयाकडे लागले असून, प्राजक्त तनपुरे यांच्या अंगावर बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला जाणार का, याचा अंतिम फैसला अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.
प्राजक्त तनपुरे होणार दुसर्या आमदार व राहुरीला मिळाले दोन आमदार
Comments
Post a Comment